दुग्ध व्यवसायात क्रांती करण्यासाठी पशुवैद्यकीय सल्ला घेण्याची गरज

0

शहापूर । दुग्ध व्यवसायात क्रांती करावयाची असल्यास पशुआहाराचे योग्य नियोजन करून स्वच्छ व आदर्श गोठा निर्माण करण्याचा पशुवैद्यकीय सल्ला शेतकर्‍यांनी घेतला पाहिजे, असे प्रतिपादन पशुसंवर्धन विभागाचे डॉ. दिलीप धानके यांनी केले. गोदरेज पशुआहार कंपनी व मनीषा दूध डेअरी यांच्या वतीने किन्हवली येथे दूध उत्पादक शेतकरी यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पशुवैद्यकीय दवाखाना किन्हवली येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. धानके बोलत होते.

गायी म्हशींनासुद्धा माणसांसारखा आधार कार्ड नोंदणी क्रमांक आला आहे. म्हणून आपल्या जनावरांची अधिकृत नोंदणी शासनदरबारी होण्यासाठी आपल्या गायी म्हशीच्या कानात एक नोंदणी बिल्ला मारून घ्यायला हवा, असे आवाहन करून डॉ. धानके यांनी केले. तसेच शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यातील मनीषा डेअरीने गोदरेज कंपनीचे सहयोगाने मनिषा गोल्ड नावाचा कोकणातील पहिलाच पशुआहाराचा ब्रॅन्ड निर्माण करून ठाणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना संजीवनीच दिल्याचे गोदरेज कंपनीचे व्यवस्थापक जोशी यांनी सांगितले.

शेतकर्‍यांचा सहभाग
यावेळी शहापूर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष तथा शिवसेना तालुकाप्रमुख मारुती धिर्डे यांनीसुद्धा मार्गदर्शन केले, तर यावेळी मनीषा गोल्ड पशुआहाराचे लोकार्पण करण्यात आले. सर्व मान्यवरांचे मनीषा कॅटल फीड कंपनीचे मुख्य संचालक वामनशेठ गायकर यांनी स्वागत केले. या मेळाव्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील धानके, तातु शिर्के, न्यू. इंडिया इन्शुरन्स कंपनीचे निलेश प्रभू यांच्यासह शहापूर तसेच मुरबाड तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.