दुचाकीचा कट लागल्याने तरुणाला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण

0

पांडे चौकातील घटना ; पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

जळगाव : दुचाकीच्या कट लागल्याच्या कारणावरुन चार जणांनी सिनेस्टाईल एका तरुणाला कपडे फाडून तोंडातून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी एक वाजता पांडे चौकात घडली. या हाणामारीमुळे चौकात चारही बाजूंनी वाहतूक खोळंबल्याने पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्जही करण्यात आला. मारहाण करणार्‍यापैकी एक पोलिसांच्या हाती लागला, मार खाणार्‍यासह इतर तिघे पळून गेले.

याबाबत प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार, पांडे चौकात जिल्हा रुग्णालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर एका बुलेटला दुचाकीचा कट लागला. त्यावरुन बुलेटस्वार व दुचाकीस्वार यांच्यात बाचाबाची होऊन एकमेकाच्या कानशिलात लगावली. काही क्षणातच बुलेटस्वाराच्या मदतीला आणखी तीन जण धावून आले, त्या चौघांनी दुचाकीस्वार तरुणाला लाथाबुक्यांनी बेदम तुडवले.

बघ्यांमधील कुणीही मदतीला आले नाही
या हाणामारीमुळे चौकात चारही बाजुंनी वाहने अडकली होती. एकही वाहन पुढे जात नव्हते. इतकेच काय जिल्हा पेठ पोलिसांचे वाहन आले, मात्र त्यालाही रस्ता नव्हता. गर्दी प्रचंड असल्याने सौम्य लाठीमार करावा लागला. यात हाणामारी करणारा एक जण पोलिसांच्या तावडीत सापडला तर अन्य तिघे जण व मार खाणारा असे सर्व जण पळून गेले. सर्व जण उघड्या डोळ्यांनी घटना बघत होते. मात्र कुणीही तरुणाचा मदतीला धावून आले नाही.

बेंडाळे चौकातही हाणामारी

पांडे चौकातील घटनेनंतर काही वेळाने डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या चौकातही सायकलला धक्का लागल्याच्या कारणावरुन विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यावेळी देखील प्रचंड गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी झाली होती. जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौघे विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.