यावल शहरातील महाराष्ट्र धाब्याजवळ अपघात ; दोन जण गंभीर जखमी
यावल- दुचाकीवर ट्रीपलसीट भुसावळकडे येणार्या वाहनधारकांच्या दुचाकीचा टायर फुटल्याने एक जण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी नऊ वाजता यावल-भुसावळ रस्त्यावरील महाराष्ट्र धाब्याजवळ घडली. अपघातानंतर दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला जावून झाडावर आदळली. शेख अजीम शेख सैफुद्दीन (25, अडावद, ता.चोपडा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. दरम्यान, दोन्ही जखमींना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले.
दुचाकीस्वाराला गाठले मृत्यूने
भुसावळ नाक्याच्या पुढे महाराष्ट्र धाब्याच्या समोर दुचाकी (एम.एच. 19 ए.सी. 7131) द्वारे शेख अजीम शेख सैफुद्दीन (अडावद, ता.चोपडा) ने जात असताना भुसावळ नाक्याजवळ शेख यांच्या दुचाकीला हात देऊन निमगाव येथे जाण्याकरीता शेख कलीम शेख बशीर (30) व रईस गुलाम रसूल (30) हे दुचाकीवर बसले. तीनही दुचाकीवर जात असताना अचानक समोरील टायर फुटल्याने दुचाकी झाडावर जावून आदळली दुचाकीस्वार शेख यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कदीर खान, हाफीज खान सुभान खान, शेख आलीम, शेख अजहर, रहिम शेख, सईद शाह, शेख करीम, जफर मोमीन, फारूख मुन्शी, शेख नईम आणि हवालदार गोरख पाटील आदींनी धाव घेत जखमींना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले. रुग्णालयात डॉ.स्वाती कवडीवाले, आरती कोल्हे, नेपाली भोळे, प्रवीण बारी आदींनी उपचार केले. यानंतर दोन्ही जखमींना तत्काळ पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मृतक शेख अजीमच्या पश्चात आई-वडील, दोन लहान भाऊ, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे.