दुचाकीचोर भावांकडून महागड्या चार दुचाकी हस्तगत

0

धार्मिक व्यवसाय करणारे पिता-पूत्रही रडारवर ; गुन्हेगार मुलांना पकडल्यावर आईला अश्रू अनावर

जळगाव : एमआयडीसी पोलिस कर्मचार्‍यांनी डमी ग्राहक पाठवून दुचाकी चोरट्यांचा शुक्रवारी पर्दाफाश केला. यात अटकेतील किसन गजराम यादव व शुभम गजराम यादव (दोन्ही रा.महाजन नगर, रामेश्‍वर कॉलनी) या दोघा भावांकडून ठिकठिकाणाहून चोरलल्या आणखी चार महागड्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. दरम्यान किसन व शुभम या दोन्ही भावांचे पितृछत्र हरपले आहे. आईच त्यांचा सांभाळ करीत आहेत. शिक्षण घेण्याच्या वयातच गुन्हेगारीकडे वळून मुलांना अटक झाल्याने आईला अश्रू अनावर झाले होते, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.

किसन यादव व शुभम यादव या दोन्ही भावांसह एक अल्पवयीन मुलाला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यावर दोघांना 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शनिवारी या तिन्ही संशयितांकडून 2 लाख 82 हजार रुपये किमतीच्या चार महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

यांच्या दुचाकी गेल्या होत्या चोरी
त्यात राजेश जवाहरलाल लालवाणी (रा.सिध्दी विनायक कॉलनी, जळगाव) यांच्या मालकीची बुलेट क्र.एम.एच.19 सी.एन.2304, हर्षद दिलीपकुमार नागपाल (रा.सिंधी कॉलनी,जळगाव) यांच्या मालकीची बुलेट क्र.एम.एच.19 सी.एच.4898, विशाल अशोक जगदाळे (रा.शनी पेठ, जळगाव) यांच्या मालकीची केटीएम कंपनीची महागडी दुचाकी क्र.एम.एच.19 सी.के.0002 व भुसावळ येथील नंदू रज्जन ढंढोरे यांच्या मालकीची बुलेट क्र.एम.एच. 19 बी.वाय.6612 यांच्या दुचाकींचा समावेश आहे. त्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. या दुचाकी चोरी प्रकरणी एमआयडीसी, शनी पेठ व भुसावळ बाजार पेठ पोलिसात गुन्हे दाखल आहेत.

प्रजापतनगरातील संशयित पिता-पूत्रही रडारवर
अल्पवयीन मुलासह दोघांनी प्रजापत नगरातील पिता-पूत्राच्या मदतीने भुसावळ येथेही दुचाकी लांबविल्याचे निष्पन्न झाले आहे. धार्मिक विधीचा व्यवसाय करणारे पिता-पूत्र मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून तेही पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींची संख्या वाढणार आहे. दरम्यान सिंधी कॉलनीतून चोरलेल्या बुलेटसह ती असलेल्या संशयिताचा पोलिसांडून शोध घेतला जात आहे.