मुक्ताईनगर : तालुक्यातील वढवे येथील एका इसमाच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून अज्ञाताने तीन लाखांची रोकड लांबवल्याची घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर शहरात घडली. मुक्ताईनगर तालुक्यातील वडगाव येथील सुरेश रघुनाथ बोठे यांनी मुक्ताईनगर येथील आयसीआयसीआय बँकेतून त्यांच्या नातेवाईकास देण्यासाठी तीन लाखांची रोकड काढल्यानंतर ते मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवर असलेल्या गणेश इलेक्ट्रिकल दुकानात बटण घेण्यासाठी आले व त्यांनी मोटरसायकल रस्त्यावर लावली. दुचाकीच्या डिक्कीमध्ये तीन लाख होते. सुरेश बोठे हे दुकानात बटण घेत असतानाच त्यांच्या डिक्कीतून तीन लाखांची रोकड चोरट्यांनी लांबवली. मुक्ताईनगर पोलिसात बोठे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रावण गोंडू जवरे हे करीत आहेत.