भुसावळ : दारूची बेकायदा वाहतूक करताना दोघांना बाजारपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्या ताब्यातून दुचाकीसह 28 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहरातील विठ्ठल मंदिराच्या बाजूला रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. प्रदीप प्रकाश सदावर्ते (32) अनिल सुरेश सदावर्ते (22, रा.व्दारका नगर, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांना दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. दोन्ही आरोपी दुचाकी (एम.एच.19 बी.डी.9358) वरून येताना दिसताच त्यांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. आरोपींच्या ताब्यातून तीन हजार 600 रुपये किंमतीच्या कॅनन बियर कंपनीच्या 24 बाटल्या, एक हजार 980 रुपये किंमतीच्या ट्युबर्ग बियर कंपनीच्या 12 बाटल्या तसेच दोन हजार 496 रुपये किंमतीच्या देशी टँगो पंच कंपनीच्या या 48 बाटल्या तसेच 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून 28 हजार 76 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, दिनेश कापडणे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव आदींनी ही कारवाई केली.