हेल्मेट घातले नसल्यास कारवाई होणार
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीला होणारा विरोध हा काही नवा नाही. परंतु आता दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे असा नियम पुणे वाहतूक पोलिसांनी केला आहे. आणि दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले नसल्यास कारवाई होणार अशी माहिती वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे. 1 जानेवारी 2019 पासून न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यामध्ये हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी शहरातील दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई चालू केली होती.
मागे बसलेल्या व्यक्तींचा अपघातात मृत्यू
पुणेकरांनी हेलमेटसक्तीचा रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला होता. तरीदेखील पुन्हा पुणे पोलिसांनी दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे असा नियम केला आहे. मागील काही दिवसांपासून दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाल्याचे दिसून आल्याने दुचाकीस्वारासह त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालावे, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केले आहे.