ठाणे – कॉलसेंटरमध्ये नोकरीसाठी मुलाखत देऊन घरी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला कंटेनरने धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला असून ही घटना मुंब्रा येथे घडली. मारुफ डुकरे शेख असे त्या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मुंब्र्यातील देवरीपाडा येथील मारुफ डुकरे शेख हा नोकरीसाठी दुचाकीवरुन कॉलसेंटरमध्ये मुलाखत देण्यासाठी आला होता. काम आटोपल्यानंतर शनिवारी ५ वाजण्याच्या सुमारास मारुफ मुंब्रा बायपासमार्गे घरी निघाला होता. दरम्यान बायपासवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने मारुफच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. यानंतर जखमी मारुफला प्रथम मुंब्रा येथील बिलाल खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात कंटेनरच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.