दुचाकी अडवून पिस्तूल रोखणार्‍यास पंधरा दिवसांची शिक्षा

0

जळगाव : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथुन जामनेर तालुक्यातील पाळधी कडे मित्रासोबत जात असताना मागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी दुचाकी अडवून पिस्तूल रोखल्याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल होता. या खटल्यात जिल्हा न्यायालयाने संशयित अमोल उर्फ पप्पू जाधव रा. पाळधी ता.जामनेर यास 15 दिवसांची शिक्षा व 3 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जामनेर तालुक्यातील विनोद जाधव तसेच मित्र योगेश न्हावी असे दोघे (एम.एच. 19. 6690) या दुचाकीवरून 24 मे 2016 रोजी सकाळी 09 वाजता सुनसगाव येथुन अंत्यविधी आटोपल्यानंतर पाळधीकडे येत असताना पाळधी गावाच्या अलिकडे कपाशीच्या जिनींगजवळ अर्धा कि.मी. अंतरावर जाधव यांच्या पाठीमागून अमोल उर्फ पप्पू जाधव व त्याचा मित्र भुर्‍या उर्फ सचिन पांढरे रा. पहुर दुचाकीने येऊन जाधव यांची दुचाकी अडवित थांबविली व तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत अमोलने शिवीगाळ केली आणि गावठी पिस्तूल विनोदच्या दिशेने रोखले. त्यामुळे विनोद याने दुचाकी सुनसगावकडे पळविली होती.याप्रकरणी पहूर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

5 साक्षीदार तपासले
तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. न्या. एस.जी. थुबे यांच्या न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. यात फिर्यादी, पंच, तपासाधिकारी आदी पाच जणांच्या साक्षी तपासण्यात आल्या. त्यानुसार न्या. थुबे यांनी अमोल उर्फ पप्पू यास दोषी धरून भादंवि कलम 341 अन्वये 3000 रूपये दंड तर भादंवि कलम 506 अन्वये पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. वैशाली महाजन यांनी कामकाज पाहिले. केसवॉच म्हणून अरूण वाणी तर पैरवी अधिकारी म्हणून मिस्तरी यांचे सहकार्य लाभले.