दुचाकी अपघातात नर्‍हेचा युवक ठार

0

हिंजवडी : भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकून पुलावरून खाली पडली. या अपघातात दुचाकीवरील दहावीचा विद्यार्थी जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर बावधन येथे घडली. आयुष अशोक भाटिया (वय 16, रा. नर्‍हे, आंबेगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी अशोक भाटिया (वय 42) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मित्राकडून घरी परतताना अपघात
आयुष दहावीची परीक्षा देत होता. सीबीएसई मंडळाकडून घेतल्या जाणार्‍या परीक्षेतील तीन विषयांचे पेपर अद्याप झालेले नव्हते. परीक्षा झाल्यानंतर आयुषचा वाढदिवस होता. परीक्षा संपल्यानंतर वाढदिवस साजरा करण्याचे त्याने ठरवले होते. त्यामुळे सोमवारी दुपारी तो बावधन भागातील मित्राला भेटण्यासाठी गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीस्वार आयुष घराकडे परतत होता, असे पोलिसांनी सांगितले.

चाळीस फूट उंचीवरून दुचाकी कोसळली
बावधन येथील पुलावर पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने आयुषच्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यानंतर आयुषचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला. तेथून तो थेट चाळीस फूट उंचीवरून सेवारस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.