दुचाकी क्रेनवर धडकली : दोघांचा मृत्यू, एक गंभीर

0

गोताणे गावावर शोककळा : रास्ता रोकोमुळे वाहतूक ठप्प

धुळे- तालुक्यातील गोताणे येथून कुसुंबा येथे येणार्‍या दुचाकी व कुसुंब्याकडून गोताणेकडे जाणारी क्रेन यांची समोरासमोर धडक होऊन जखमी झालेल्या तिघांपैकी दोघांचा रूग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला. तिसर्‍या जखमीची प्रकृतीही गंभीर असून त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी घडलेल्या या घटनेसंदर्भात गुरूवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोेको करण्यात आला. त्यामुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. संदीप काशिनाथ पाटील (30), रावसाहेब आबाजी पाटील (28) दोघे रा.गोताणे अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. तर विजय पाटील (25) याने या अपघातात पाय गमावला. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
बुधवारी संध्याकाळी संदीप पाटील, रावसाहेब पाटील व विजय पाटील हे दुचाकीने कुसुंबा येथील बाजाराला येत होते. राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू असून तेथील वळण रस्त्यावर (बायपास) दुचाकी व क्रेनची समोरासमोर धडक झाली. त्यात दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त कळताच ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना सरकारी व खाजगी रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर लगेच उपचार सुरू करण्यात आले. मात्र शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या संदीप काशिनाथ पाटील याचा मृत्यू झाला तर तासाभराने खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असलेल्या रावसाहेब पाटील याचा मृत्यू ओढवला. तत्पूर्वी धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी भेट देऊन माहिती घेऊन तत्परतेने उपचाराची सूचना केली. विजय पाटील याच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

रास्ता रोको, मदत जाहीर
चौपदरीकरणाचे काम जीएचव्ही कंपनीकडे असून या कंपनीचीच क्रेन असल्याने गोताणे व उडाणे ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास रास्ता रोको करून मयताच्या कुटुंबाना आर्थिक मदत देण्याची मागणी केली. रास्ता रोकोमुळे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली. त्यानंतर आंदोलन थांबवून आंदोलक व कंपनीच्या अधिकार्‍यांत चर्चा झाली. त्यानुसार मयताच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख व जखमीच्या कुटुंबास अडीच लाख रुपये देण्याचे अधिकार्‍यांनी जाहीर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.