रावेर : दुचाकी चोरट्याला रावेर पोलिसांनी मध्यप्रदेशच्या खंडवा येथून अटक केली आहे. शेख नदीम शेख जमोल (25, राफरनगर पाण्याच्या टाकीजवळ, रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून रावेरातून लांबवलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून अटक
रावेर शहरातील वसीम अब्दुल वाहेद खाटीक (34, मरकज मशीदजवळ, रावेर) यांच्या मालकीची 35 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.जी.6460) ही रावेर शहरातील मरकज मशीदीजवळून चोरीला गेली होती. या प्रकरणी शुक्रवार, 10 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही दुचाकी आरोपी शेदी नदीमने चोरल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास खंडवा येथील बंगाली कॉलनी भागातून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चोरी केलेली दुचाकी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, नाईक विष्णू भील, सुरेश मेढे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, प्रमोद पाटील, अमोल जाधव, विकार शेख, सुकेश तडवी आदींच्या पथकाने केली.