दुचाकी चोरट्यांची टोळी अमळनेर पोलिसांच्या जाळ्यात : चोरीतील 10 दुचाकी जप्त

अमळनेर : अमळनेर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून टोळीतील चौघांकडून तब्बल चोरीतील दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गोपनीय माहितीवरून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात
अमळनेर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागातून दुचाकींच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्यातील संशयीत आरोपींना शोधण्याचे निर्देश दिले होते. अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयीत आरोपी भुषण शांताराम पाटील (रा. तांबेपूरा, अमळनेर) हा दुचाकी चोरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. पथकातील सहाय्यक फौजदार पूंजू कुमावत, बापू साळुंखे, पोहेकॉ सुनील हटकर, नाईक मिलिंद भामरे, दिलीप माळी, सूर्यकांत साळुंखे, रवींद्र पाटील या पथकाने संशयीत आरोपी भुषण पाटील याला ताब्यात घेतले. त्याच कसून चौकशी केली असता दुचाकी चोरी करणारे इतर तीन साथीदार असल्याची कबुली देताच अन्य तीन संशयीतांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

आरोपींकडून चोरीतील दहा दुचाकी जप्त
संशयीत भूषण पाटीलच्या माहितीनंतर पोलिसांनी संशयीत आरोपी गजानन दिलीप ताकतोडे (रा.गांधलीपुरा, अमळनेर), विक्की जवाहरलाल सोनवणे (सानेनगर, तांबेपूरा, अमळनेर), संभाजी बाळू पाटील (सातरणे, ता.जि.धुळे) यांना अटक करताच आरोपींनी गुन्ह्यांची कबुली दिली. चौघांकडून चोरीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी व्यक्त केली.