दुचाकी चोरट्यांना युनिट १ च्या पोलीसांनी ठोकल्या बेड्या

0

पिंपरी । महागड्या दुचाकी चोरणा-या टोळीतील चारजणांना गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 8 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या एकूण 7 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई गुरूवारी (दि. 12) करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे आणि पथक गणेश विसर्जन मिरवणुकीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस शिपाई विजय मोरे यांना सांगवी, येरवडा, लोहगाव परिसरात काही तरुणांकडे चोरीच्या दुकारी असल्याची माहिती मिळाली. त्यावर पोलिसांनी अतिक वाहीद शेख (वय 19), वाशिम वाहीद शेख (वय 21, दोघे रा. नागपूर चाळ 191, येरवडा धाम, ज्योती संघटना, बुध्द विहार, येरवडा), राजेश दत्तात्रय भोसले (वय 20, रा. कलवड वस्ती, लोहगाव रोड लेन नं 8, लोहगाव) आणि प्रविण उत्तम कांबळे (वय 19, रा. पिंपळे गुरव, इंदारानगर लेन नं. 5, सांगवी) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून तीन महागड्या केटीएम दुचाकी, एक ज्युपीटर, एक स्प्लेंडर, अक्सीस व एक यामाहा दुचाकी ताब्यात घेतल्या. एकूण 8 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 7 दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींपैकी अतिक वाहीद शेख आणि वाशिम वाहीद शेख हे सख्खे भाऊ आहेत. वाशिम हा एक महिन्यापूर्वी अमेझॉन कंपनीत वडगाव शेऱी येथे कामाला होता. त्याने कंपनीच्या पार्सलमधील 5 मोबाईल काढून घेतले होते. ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्याच्या आईवडिलांना 1 लाख 8 हजार रुपये भरावे लागले होते.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, सह आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर आयुक्त रामनाथ पाकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहा आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरीष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी रविंद्र राठोड, प्रमोद लांडे, शिवाजी कानडे, मनोजकुमार कमले, विजय मोरे, गणेश सावंत, प्रविण पाटील यांच्या पथकाने केली.