अनेक गुन्ह्यांची होणार उकल : निरीक्षक दिलीप गांगुर्डेंसह शोध पथकाची कारवाई
धुळे- धूम स्टाईल येत मोबाईल लांबवण्यासह दुचाकी लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी कारवाईच्या सूचना दिल्यानंतर धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे व शोध पथकाच्या कर्मचार्यांनी चार चोरट्यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली. आरोपींच्या ताब्यातून चार चोरीच्या दुचाकी तसेच 12 मोबाईल मिळून दोन लाख 65 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गुप्त माहितीवरून आरोपींना अटक
तक्रारदार राहुल गायकवाड (चितोड रोड, धुळे) यांची बुलेट (एम.एच.18 ए.यु.5045) 30 जुन रोजी चोरीला गेली होती तर 1 जुलै रोजी पायी चालणारा तक्रारदाराचा धूम स्टाईल चोरट्यांनी मोबाईल लांबवला होता. दुचाकी चोरी प्रकरणी भारत तात्याजी काळे (21) व एका अल्पवयीन आरोपीस (दोन्ही रा.वाकडी, गणेश नगर, ता.राहता, जि.अहमदनगर) तर मोबाईल चोरी प्रकरणी सुरेश बबन ठाकेर (19, पाटबंधारे कॉलनी, देवपूर, धुळे) व राहुल सुनील घोडे (19, वाडीभोकर रोड, देवपूर, धुळे) यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींकडून एक लाख 55 हजार रुपये किंमतीच्या बुलेटसह चार दुचाकी तसेच एक लाख 10 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक एम.रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप गांगुर्डे, नाना आखाडे, हिरालाल बैरागी, मिलिंद सोनवणे, भिका पाटील, किरण जगताप, मच्छिंद्र पाटील, अखलाक पठाण, प्रल्हाद वाघ, दीपक दामोदर, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, दिनेश परदेशी आदींनी आरोपींना अटक केली.