जळगाव। राष्ट्रीय महामार्गावरी झालेल्या अपघातात बेवारस पडलेली दुचाकी चोरणार्या चोरट्याला औद्योगीक वसाहत पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संशयीताची पाळत ठेवून वाट पाहत असतांना समोर येवुन चोरटा निसटणारच त्याचा पाठलाग करुन पंचमुखी हनुमान मंदीर परीसरातील सुपारी कारखान्या जवळ त्याला अटक करण्यात आली. अटक केल्यावर संशयीताला तालूका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तालुका पोलिसात होता गुन्हा दाखल
औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्याचे पथक वाहन चोरीचा तपास करीत असतांना त्यांना, वेगळ्याच गुन्ह्यातील दुचाकीचोरटा वाहनासह मिळून आला आहे. मुंबई-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या वाहन अपघातात जखमीने सोडून दिलेली दुचाकी चोरीला गेली होती. अज्ञात चोरट्याने घटनास्थळावर पडलेली दुचाकी चावीसह चोरुन पोबारा केला होता. तालूका पोलिसांत दाखल गुन्ह्यात गेल्या वर्षभरापासुन संशयीताचा शोध सुरु होता. पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या पथकातील रामकृष्ण पाटील, शशिकांत पाटील, किशोर पाटील, मनोज सुरवाडे, हेमंत कळस्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन राकृष्ण पाटील, नितीन बाविस्कर, संदिप पाटील, मनोज सुरवाडे यांनी दुचाकी चोरट्यासाठी एम.जे.कॉलेज परिसरात सापळा रचला.
चोरीची कबूली
मिळालेल्या माहिती प्रमाणे चोरटा दुचाकी घेवुन पोचलाही मात्र त्याला पोलिस असल्याचा संशय येवुन त्याने प्रभात कॉलनी चौक मार्गे सुसाट वेगात गाडी दामटत नेरीनाका, कासमवाडीत गल्ली बोळात गाडी घालून पसार झाला मागावर असलेल्या पथकाने वेगवेगळे होत त्याचा शोध चालवल्यावर सुपारी कारखान्या समोर त्याच्या दुचाकीला वाहन आडवे लावून त्याला पकडण्यात आले. ताब्यात घेतल्यावर त्याने निवृत्ती उर्फ गोपाल गजानन सोनवणे असे नाव असल्याचे सांगत चोरीची कबुली दिल्यावर त्याला चोरीच्या हिरो हंक वाहनासह(क्र एमएच19,सीए. 4767) अटक करण्यात येवुन तालूका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.