तीन चोरांकडून 20 मोटारसायकल जप्त; भोसरी पोलिसांनी कारवाई
पिंपरी-चिंचवड : दुचाकीचे कुलूप तोडून चोरण्यासाठी सोप्या असणार्या स्प्लेंडर प्लसवर चोरांचा डोळा आहे. तीन दुचाकी चोरांकडून भोसरी पोलिसांनी तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या. प्रदीप उर्फ फंट्या दत्तात्रय करवंदे (वय 23, रा. कान्हेवाडी, ता. खेड), गणेश गोपाळ मेदगे (वय 22, रा. अवदर, ता. खेड) आणि गोट्या उर्फ कैलास बबन पारधी (वय 36, रा. ठाकरवाडी, ता. खेड) अशी अटक केलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. तिघांकडून 4 लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
गस्त घालताना आला संशय
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस 30 मार्च रोजी आळंदी रोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दोन स्प्लेंडर प्लसवर तिघेजण संशयितरित्या फिरताना आढळले. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील दुचाकीचे इंजिन नंबर आणि चॅसी नंबर तपासून पहिला असता, त्या दुचाकी चोरीच्या असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, तिघांनी मिळून विविध ठिकाणांवरून 20 मोटारसायकल चोरल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या 20 मोटारसायकलपैकी 19 मोटारसायकल स्प्लेंडर प्लस कंपनीच्या आहेत. तर 1 मोटारसायकल सुझुकी आहे.
आता दुचाकीच्या मूळ मालकांचा शोध
यामुळे भोसरी, भोसरी एमआयडीसी, खेड, आळंदी, शिरूर आणि चाकण या पोलीस ठाण्यातील सात दुचाकीचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य 13 दुचाकीच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. ही कामगिरी उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, परिमंडळ 3चे पोलीस उपआयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पोलीस नाईक संदीप गवारी, विपुल जाधव, दीपक साबळे, पोलीस शिपाई किरण जाधव, विजय तेलेवार, नितीन खेसे यांनी केली.