बारामती । बारामती, दौंड आणि यवत परीसरात दुचाकी चोरणार्या टोळीला अटक करण्यात बारामती गुन्हे शोध व उपविभागीय गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पाच गुन्ह्यांतील दीड लाखांचा मुद्देमाल चोरट्यांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्यांकडून हस्तगत करण्यात आला आहे. चोरट्यांमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.
बारामती, दौंड तालुक्यातून मोटार सायकल चोरीला जाण्याच्या गुन्ह्यात वाढ झाली होती. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. संदिप पखाले यांनी गुन्हे शोध पथकाला या गुन्ह्यांबाबत तपास करण्यास सांगितले होते. हे गुन्हे अक्षय भोसले या अल्पवयीन मुलाने इतर दोन साथीदारांमार्फत केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने मनोज इंगळे या अल्पवयीन व इतर दोन साथीदारांसह चोरी केल्याचे सांगितले. बारामती शहर, बारामती तालुका, दौंड, यवत या भागांतून 2 पल्सर, 1 एव्हिएटर, 1 डिस्कव्हर अशा एकूण 4 मोटार सायकली चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. बारामती गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, बाळासाहेब भोई, अनिल काळे, संदीप मोकाशी, पोलीस नाईक संदीप जाधव, रविराज कोकरे, सुभाष डोईफोडे, पोलीस हवालदार दशरथ कोळेकर, तुषार सानप, शर्मा पवार यांनी ही कारवाई केली.