दुचाकी चोरीचा गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ

0

आठवडाभरानंतर झाला गुन्हा दाखल

जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी आठवडाभरानंतर अज्ञात चोरट्याविरोधात जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुचाकी चोरी झाल्याप्रकरणी ऑनलाईन तक्रार करून सर्व कागदपत्रे तयार असतांना गुन्हा नोंदविण्यास जिल्हापेठ पोलिसांनी आठवडाभर टाळाटाळ केली. गुरुवारी तक्रारदाराचे परिचयातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कर्मचारी यांच्यामुळे गुन्हा दाखल झाला.

याबाबत माहिती अशी की, सुनिल विठ्ठल वाणी (वय-56) रा. वाणी गल्ली, शिरसोली ता.जि. जळगाव हे आपला मुलगा गौरव सुनिल वाणी आणि शालक नंदकिशोर दत्ताय वाणी यांच्यासोबत 18 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्याच्या परीसरात असलेल्या गणपती मंदीराजवळील नेत्र विभागासमोर दुचाकी (क्रमांक एमएच 19 बीएक्स 8745) ही गाडी लावली. त्यांच्या बाजूला शालकाची दुचाकी उभी केली. दुपारी 12 वाजता नातेवाईकांना भेटल्यानंतर परत आले तेव्हा त्यांना दुचाकी मिळून आली नाही.

गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ

दुचाकी हरविल्याप्रकरणी ऑनलाईन तक्रार त्याच दिवशी केल्यानंतर सर्व कागदपत्र घेवून सुनील वाणी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी संबंधित कर्मचार्‍याडून गुन्हा नोंदविण्यासाठी टाळाटाळ करण्यात आली. तक्रारदार हे पोलीस ठाण्याच्या आवारात उभे असतांना त्यांच्या ओळखीचे पोलीस कर्मचारी भेटले. पोलीस कर्मचारी ओळखीचा असल्याने त्यांच्या मदतीने अखेर गुरुवारी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हा पेठ पोलिसांची काम करण्याची पध्दत अतिशय चुकीची असून त्यांच्या कामचुकारपणाबद्दल तक्रारदारांने नाराजीचा सूर काढला.