दुचाकी चोरून नेणार्‍या दोन संशयितांना अटक

जळगाव : दुचाकी चोरट्यांच्या जळगाव गुन्हे शाखेने मंगळवारी मुसक्या आवळल्या. आरोपींनी जळगाव तालुक्यातील आव्हाने येथे शेताच्या बांधावरून दुचाकी लांबवली होती. दीपक भास्कर सपकाळे व राजू बुधो सपकाळे (दोन्ही रा.धामणगाव, ता.जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

शेताच्या बांधावरून लांबवली दुचाकी
जळगाव तालुक्यातील आव्हाने येथे अरुण देवराम चौधरी (49) हे वास्तव्यास आहेत. ममुराबाद रोडवर आव्हाने शिवारात त्यांची शेती आहे. अरुण चौधरी हे 1 नोव्हेंबर 2021 रोजी शेतात त्यांच्या भावाची एम एच 19 ए. आर 44 77 ही दुचाकी घेऊन गेले होते. शेताच्या बांधावर उभी केलेली दुचाकी दोन जणांनी चोरून नेली होती. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आल्याने अरुण चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील धामणगाव येथील रेकॉर्डवरील संशयित दीपक सपकाळे व त्याच्या साथीदाराने ही दुचाकी चोरी केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार बकाले यांनी पोलीस हवालदार जितेंद्र पाटील अक्रम शेख महेश महाजन नितीन पाटील अविनाश देवरे भारत पाटील यांच्या पथकाला संशोधना अटक करण्याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. पथकाने मंगळवारी संशयित दीपक भास्कर सपकाळे व राजू बुधो सपकाळे (दोन्ही रा. धामणगाव) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आव्हाने येथून चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी दोघांना जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.