दुचाकी दुभाजकाला धडकल्याने एकाचा मृत्यू

0

पुणे : मित्राला पुणे स्टेशन येथे सोडविण्यासाठी जात असलेल्या दुचाकीस्वारास गतिरोधकाचा अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी गतिरोधकावरून उडून दुभाजकाला धडकली. रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना मार्केट यार्ड परिसरात सोमवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. हमीद मुर्तुजा हुसेन (34, रा. कोंढवा, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी अरमान खान (26, रा.कोंढवा) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीचे हुसेन हे मित्र होते. फिर्यादी हे फरशी बसविण्याचे, तर हुसेन हे प्लंबिंगचे काम करत होते. हुसेन हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे स्टेशन रेल्वेस्थानक फिर्यादीला सोडण्यासाठी निघाले होते. दुचाकी मार्केट यार्डजवळील वखार महामंडळ चौकामध्ये आली असताना हुसेन यांना गतिरोधकाचा अंदाज आला नाही. त्यामुळे भरधाव दुचाकी गतिरोधकावर एक ते दीड फूट उंच उडून दुभाजकावर आदळली.