दुचाकी वाहनांची दुरुस्ती महागली

0

पिंपरी-चिंचवड : वाढत्या महागाईमुळे गॅरेज मालक व चालक संघटनेने दुचाकी वाहनांच्या दुरुस्तीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासून पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीने दर वाढविले आहेत. त्यामुळे आता दुचाकी वाहनाच्या दुरुस्तीसाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

आर्थिक बाजू तपासून निर्णय
पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. तसेच नवीन जीएसटी कर विचारात घेता, दुचाकी गॅरेज मालक व चालक यांनी दुचाकी दुरुस्तीचे शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना देत असलेली सेवा व शुल्क हे मागील वर्षाच्या तुलनेने कमी तसेच न परवडणारे आहेत. त्यामुळे व्यवसाय करताना आर्थिक बाजूचा विचारात घेता संस्थेने यंदापासून सर्व कामाचे व सेवेचे शुल्क वाढविलेले आहे, असे पत्रकात म्हटले आहे.

गॅरेज चालकांना आवाहन
पिंपरी-चिंचवड ऑटोमोटिव्ह सर्व्हिस सोसायटीने शुल्क वाढविलेले दरपत्रक सर्व गॅरेज चालकांनी आपल्या दुकानामध्ये दर्शनी बाजूस लावावे. तसेच त्या दरपत्रकाप्रमाणे ग्राहकांना सेवा पुरवून गॅरेज व्यवसायामध्ये एकसूत्रता ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन सोसायटीच्या वतीने देवेंद्र मोरे यांनी केले आहे.