भुसावळ प्रतिनिधी दि 7
येथील कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, नियोजन अभ्यास मंडळ आणि जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी दुचाकी व घरगुती उपकरणे दुरुस्ती अनिवासी शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक, तर उद्घाटक म्हणून प्रकल्प अधिकारी एमसीईडी जळगावचे दिनेश गवळे प्रमुख पाहुणे म्हणून. महेश फालक, चेअरमन, ताप्ती एज्युकेशन सोसायटी, भुसावळ, संजय नाहाटा, कोषाध्यक्ष, ताप्ती एज्युकेशन सोसायटी सोसायटी, भुसावळ, उपप्राचार्य डॉ. ए. डी. गोस्वामी, समन्वयक प्रा. डॉ. एस. टी. धुम व्यासपीठावर उपस्थित होते. स्वागत समारंभ व उद्घाटन समारंभ संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक दिनेश गवळे यांनी उद्घाटन पर भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी जिल्हा उद्योग केंद्र अंतर्गत आणि एम. सी. ई. डी. अंतर्गत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कोणकोणत्या प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जाते याबाबतची माहिती दिली. याशिवाय शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला या स्पर्धेच्या काळात शासकीय किंवा खाजगी कंपनीत नोकरी मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. अशावेळी आपल्यावर बेरोजगारीची वेळ येऊ द्यायची नसेल, तर आपण एखादे छोटे-मोठे व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले असेल तर आपल्याला आपल्या भावी जीवनाला दिशा देता येते. या महिनाभर चालणाऱ्या अनिवासी शिबिरात एस.सी. संवर्गातील विद्यार्थ्यांना दुचाकी दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार असून प्रशिक्षणांतर्गत दुचाकीची इंजिन पासून ते सर्व प्रकारच्या दुचाकीच्या दुरुस्तीच्या प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर प्रात्यक्षिकाच्या स्वरूपात प्रशिक्षण दिले जाणार आहे. जनरल विद्यार्थ्यांसाठी घरगुती उपकरण दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यात मिक्सर, पंखा, फ्रिज, टी.व्ही., कुलर, ए.सी. इ. बाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. एक महिना संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रमाणपत्र आणि शैक्षणिक भत्ता म्हणून 1000/- रु. दिले जाणार आहेत. या प्रशिक्षणात प्रशिक्षणाबरोबरच व्यवसायाची निवड, प्रकल्प अहवाल, बँकांच्या योजना इ. बाबतची माहिती देखील दिली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ करून घ्यावा असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतांना अशा प्रशिक्षणात जर भाग घेतला, तर नोकरीच्या मागे न धावता एखादा व्यवसाय सहज करता येईल अशी माहिती दिली, तसेच अनिवासी प्रशिक्षण शिबिराला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा. प्रा. डॉ. एस.टी. धुम यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. शिवानी माळी यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. अक्षरा साबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. किरण वारके, प्रा. व्ही. ए. सोळुंके, प्रा. जे. पी. आडोकार, प्रा. शितल सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात मराठी विभागातील डॉ. जे. एफ. पाटील यांचीही उपस्थिती होती. उद्घाटन समारंभात विविध विभागातील प्राध्यापक आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.