दुचाकी-स्कुलव्हॅनच्या अपघातात तीन ठार

0

दुचाकीचा झाला चुराडा
पाळधी पोलीसात अपघाताची नोंद
जळगाव – जळगावात खासगी रूग्णालयात दाखल असलेल्या पत्नीला पाहण्यासाठी दुचाकीने शालकासोबत एरंडोलकडून जळगावकडे जात असतांना भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या टाटा मॅजिकला जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास जळगाव-पाळधी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल सुझोगी जवळ झालेल्या आपघातात दुचाकीचालक आणि टाटामॅजिक चालक जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झाला होता. मात्र त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. पाळधी पोलीसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बन्सीलाल सुभाष राठोड (वय- 30) रा. हिसाडे ता.शिरपूर जि.धुळे यांची पत्नी व एक वर्षाच्या मुलाची आजारी असल्याने गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बन्सीलाल राठोड यांच्या मोठ्या भावाची सासरवाडी एरंडोल तालुक्यातील खेडगाव तांडा येथील असल्याने सुरूवातीला ते भावाच्या सासरी गेले. सकाळी जेवण झाल्यानंतर भावाचा साला अर्जून उत्तम पवार (वय-35) रा. खेडगाव तांडा ता.एरंडोल यांच्यासोबत मोटारसायकल क्रमांक (एमएच 19, बीके 3268) ने एरंडोलकडून जळगावकडे निघाले. पाळधी सोडल्यानंतर हॉटेल सुझोकी येथून भरधाव वेगाने जात असतांना समोरून येणारी विद्यार्थ्यांना ने-आण करणारी टाटा मॅजिक (एमएच 19, बीजे 2475) ला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेले बन्सीलाल राठोड आणि टाटा मॅजिकचे चालक दिवाकर नारायण सोनकर (वय-48) रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू
मोटारसायकल चालक अर्जून पवार हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या गुप्तांगाजवळ जबर मार बसला होता. उपस्थित नागरीकांच्या मदतीने तातडीने जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमोपचार केल्यानंतर नातेवाईकांनी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले होत मात्र उपचारादरम्यान दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली.

स्कूलव्हॅनमध्ये चालक होते एकटे
मयत दिवाकर सोनकर हे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालकाचे काम करत होते. रिक्षा चालवत असतांना शाळेच्या विद्यार्थ्यांना ने-आण करण्याचे कामही करत होते. सध्या रिक्षा विकून त्यांनी टाटा मॅजिक व्हॅन विकत घेवून इंम्पेरियल स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोहचविण्याचे काम करत होते. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास जेवन झाल्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पिंप्राळ्याहून पाळधीकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या व्हॅनमध्ये कोणीही नव्हते. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, पुतणे असा परीवार आहे.

जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
सामोरासमोर झालेल्या अपघात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने दोन्ही मयतांची मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. अपघात झाल्याचे समजल्यानंतर नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. दोन्ही मयतांचे कुटुंबियांनी मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला होता. यावेळी मयत बन्सीलाल राठोड यांची पत्नी ही देखील दवाखान्यातून सासऱ्यासोबत जिल्हा रूग्णालय गाठले त्यानंतर अर्जून पवार यांच्यादेखील मयत झाल्याचा निरोप आल्यानंतर जणू दु:खाचा डोंगर कोसळला. मयत बन्सीलाल राठोड यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, एकवर्षाची मुलगी असे कुटुंबीय आहे तर अर्जून पवार यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, तीन बहिणी, पत्नी आणि 10 महिन्याचा एक मुलगा असा परीवार आहे.

रुग्णवाहिकेने तिघांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात हलविले
अपघात घडताच परिसरातीली नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कुलव्हॅन मध्ये अडकलेले दिवाकर सोनकर यांना नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर जैन इरिगेशन व राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील फाऊंडेशनच्या रुग्णवाहिकेने तिघांना जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती डॉक्टरांनी दिवाकर सोनकर व बन्सीलाल राठोड यांना मयत घोषित केले.

महामार्गावर वाहतुक विस्कळीत
अपघातानंतर महामार्गावर वाहतुक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्राचे पोलिस कर्मचारी विजय चौधरी, सुमित पाटील यांनी धाव घेवून वाहतुक सुरळीत केली. त्यानंतर रुग्णवाहिकेने तिघांना उपचारार्थ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.