दुतोंडी शिवसेना!

0

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आदी मागण्यांसाठी सध्या राज्यात शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची धार दिवसेंदिवस तीव्र होत आहे. हा संप फोडण्यामागे मुख्यमंत्री लागले होते. तसा अयशस्वी प्रयत्नही त्यांनी करून पाहिला. शेतकर्‍यांचा संप हिंसक आणि आक्रमक होण्यामागे विरोधक आहेत, अशी शंकाही फडणवीस यांनी आतापर्यंत अनेकदा बोलून दाखवली. परंतु, शेतकर्‍यांचे दु:ख काही केल्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचे, किंबहुना ते समजून घेण्याची त्यांची तयारीच नसल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारमधील एक घटक पक्ष असलेली शिवसेना सत्तेचा वापर करून शेतकर्‍यांसाठी काही करेल, अशी आशा होती. परंतु, केवळ बोलबच्चनगिरी करण्याव्यतिरिक्त या पक्षाने काहीही केले नाही. शिवसेनेने नेहमीप्रमाणे शेतकर्‍यांच्या या प्रश्‍नात केवळ भाजपला कोंडीत पकडणे हा एककलमी कार्यक्रम राबवण्याचे धोरण सुरू ठेवले. सत्तेच्या तळ्यात आणि जनतेच्या समस्यांच्या मळ्यात, असे दोन्हीकडे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करून भाजपची कोंडी करणारी शिवसेना दोन दगडांवर पाय ठेवल्यामुळे भविष्यात निश्‍चित अडचणीत येईल. किंबहुना आपण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहोत, हे त्यांच्या लक्षात कसे येत नाही?

काल शिवसेनेच्या या दुटप्पीची प्रचिती पुन्हा एकदा आली. शेतकरी संपावरून बाहेर भाजपवर टीकेचा आसूड ओढणार्‍या शिवसेना नेत्यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्यापूर्वी शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर चर्चेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ मागितला. मुख्यमंत्र्यांनी मात्र या नेत्यांना उडवून लावत वेळ दिला नाही आणि ते थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले. नाराज झालेल्या शिवसेना मंत्र्यांनी या बैठकीतून काढता पाय घेतला. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, दीपक सावंत, दिवाकर रावते हेदेखील गैरहजर राहिले. मुख्यमंत्र्यांनी केलेली ही कृती आक्षेपार्ह आहे असे मुळीच नाही. कारण सत्तेत असलेली शिवसेना बाहेर सरकारविरुद्ध शेतकरी आंदोलनात सहभागी आहे. सरकारवर टीका करत आहे आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी वेळही मागत आहे. खरे तर शिवसेनेने सत्तेचा वापर करून राज्यातील शेतकर्‍यांचा पेटलेला संप मिटवण्यासाठी काही ठोस प्रयत्न करणे अपेक्षित आहे. त्यासाठी स्वतःच रस्त्यावर उतरण्याची गरज नाही. शिवसेनेला रस्त्यावर उतरूनच आंदोलने करायची असतील आणि भाजप राज्य चालवण्यास नालायक आहे, असे वाटत असेल तर त्यांनी सरळ सत्तेतून बाहेर पडावे. शेतकरी संपाबाबत शिवसेनेने भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. आपल्या मुखपत्र ‘सामना’तून तर भाजपचे रोजच वस्त्रहरण करण्यात येत आहे. हे सर्व पाहताना शिवसेना नक्की कुठे आहे? सत्तेच्या सिंहासनावर की बाहेर, असा प्रश्‍न पडू शकतो आणि तो पडलाच पाहिजे. मी फक्त शेतकर्‍यांशी चर्चा करेन शेतकरी नेत्यांशी चर्चा करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर शिवसेनेने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. जर शेतकर्‍यांनी ठरवले की आम्ही शेतकरी मंत्र्यांशीच बोलू तर तुमच्या सरकारमध्ये एक तरी खरा शेतकरी आहे का?, असा प्रश्‍न आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. शिवसेनेच्या या टीकेला काय म्हणावे? ही तर सेनेची बौद्धिक दिवाळखोरीच! कारण सत्तेच्या मखमली पलंगावर बसून ते मुख्यमंत्र्यांना हा सवाल करत आहेत.

आपलेही मंत्री याच सरकारमध्ये खुर्च्या उबवतात, हेदेखील भान शिवसेना आणि त्यांच्या प्रमुखांना असू नये का? लढणार्‍यांना गळास लावायचे व त्या स्फोटक बॉम्बची वात काढून घ्यायची आणि बॉम्बचा रबरी चेंडू बनवायचा हे प्रकार काँग्रेसने याआधी केले आहेत. महाराष्ट्रातील फडणवीस सरकार याबाबत काँग्रेसचे अनुकरण शतप्रतिशत करताना दिसत आहे. इतर बाबतीत भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसशी टोकाचे मतभेद आहेत. काँग्रेसमुक्त हिंदुस्थानचे त्यांनी मनावर घेतलेच आहे, पण काँग्रेसची काही ध्येयधोरणे मात्र त्यांनी पवित्र करून नव्हे, तर जशीच्या तशी उचलली आहेत, असे प्रामुख्याने दिसते. याबाबत शिवसेनेनेही सामनाच्या अग्रलेखातून टीका केलीच होती. परंतु, ही टीका करताना या नकोशा आणि काँग्रेसचे अनुकरण करणार्‍या कमळाबाईशी पाट लावून बसण्याची धन्यता शिवसेना का मानत आहे? शिवसेनेला सत्तेची खुर्ची इतकी प्यारी का? एक तर शिवसेनेने आता सत्तेत राहून भाजपवर टीका करणे बंद करावे, नाही तर सरळ सरळ सत्तेतून बाहेर पडावे. महाराष्ट्रातील जनता शिवसेनेचे हे डबल ढोलके मागील विधानसभा निवडणुकीपासून पाहत आहे आणि अजूनही असे प्रकार शिवसेनेकडून सुरूच आहेत. महापालिका निवडणुकीत तर शिवसेनेने स्वत:चेच हसे करून घेतले. राज्यातील जनता दूधखुळी आहे, असे शिवसेना पक्षप्रमुखांना वाटत आहे का? तसे वाटत असेल तर त्यांनी हा भ्रम दूर करावा. राजकीय पक्षांच्या प्रत्येक हालचालीची नोंद प्रत्येकवेळी जनतेच्या स्तरावर होत असते, हे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता उलथवून महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिले आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दगडांवर ठेवलेले पाय काढून, केवळ एकच काय ती भूमिका घ्यावी आणि ही भूमिका जनहितैषी असावी, असा प्रेमळ सल्ला आम्ही त्यांना देत आहोत.