दुधखेडा धरणाच्या पाटचारीची दुरूस्ती करण्याची मागणी

0

शहादा । दुधखेडा धरणाच्या पाटचारी (कॅनल) ची तात्काळ दुरुस्ती करावी तसेच साफसफाई करुन बागायतदार शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी पुरवठा करावा या मागणीचे निवेदन दुधखेडा धरणांतर्गत येणार्‍या असलोद, दुधखेडा, न्यु. असलोद, मंदाणा येथील बागायतदार शेतकर्‍यांनी प्रशासनाकडे दिले आहे. तात्काळ मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाने शेती पाण्याविना
दुधखेडा धरण परिसरातील पाटचारी (कॅनल) मध्ये तांत्रिक दोष असल्याने पुरेशा प्रमाणात शेतीला पाणी पुरवठा होत नाही. परिणामी, उत्पादन वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शेतकर्‍यांना संबंधीत विभागाने लेखी पाणी मागणी अर्ज देवून शेतकर्‍यांना पाणी अर्जाची पोहच द्यावी तसेच धरणात येणार्‍या लाभक्षेत्रातील शंभरट क्के शेतकर्‍यांना पाणी पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असून ही अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे 50 टक्के शेतकर्‍यांना दरवर्षी पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. या मागणीची त्वरीत दखल घेवून पाटचारीची दुरुस्ती व साफसफाई करावी अन्यथा बागायतदार शेतकरी परिसरातील मंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करतील. आंदोलनाची संपुर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप गांगुर्डे, ओंकार गिरासे, रतिलाल शिंदे, भिलू शिंदे, नानाभाऊ शिंदे, नाना रावजी मराठे, दरबार गिरासे, भवानसिंग गिरासे, कोमलसिंग गिरासे, देविदास पाटील, हरेश साळुंखे, अजय गिरासे, अभिमन्यू मराठे आदि ंनी दिला आहे. निवेदनावर परिसरातील सुमारे शंभर शेतकर्‍यांची स्वाक्षरी आहे.

शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ
दुधखेडा धरणपरिसरातील बागायतदार शेतकर्‍यांनी पाटबंधारे विभाग तापीखोरे मंडळाचे मुख्यअभियंता, कार्यकारी अभियंता धुळे, उपअभियंता शहादा, तहसिलदार शहादा, पोलिस निरीक्षक शहादा यांना लेखी निवेदन दिले असून निवेदनाचा आशय असा, गत तीन चार वर्षापासून पडणारा दुष्काळ आणि पाटचारीची दुरुस्ती अभावी शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकर्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यातून शेतकरी कर्जबाजारी होण्याची समस्या निर्माण होत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये असंतोष निर्माण होवून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.