दुधाच्या पाच रुपये अनुदानाचा घोळ कायम

0

शेतकर्‍यांना 20 रुपयांचा भाव देण्याचा दूध डेअर्‍यांचा निर्णय

पुणे : राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रति लिटरला पाच रुपयांचे अनुदान घोषित केले. तसेच या योजनेस मुदतवाढ देऊनही मागील खरेदीचा थकित अनुदानाचा आकडा सुमारे 200 कोटींच्या आसपास गेला आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून दुधाची खरेदी प्रति लिटरला 25 रुपये दराने झालेली असली तरी शेतकर्‍यांना 20 रुपयांप्रमाणेच रक्कम देण्यात येईल. सरकारकडून पाच रुपये अनुदान मिळाल्यानंतर ती रक्कम शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

राज्य सरकारकडून दूध अनुदान योजनेची मुदत जानेवारी, 2019 पर्यंत म्हणजे तीन महिन्यांनी पुन्हा वाढविण्यात आली. या दरम्यानच्या काळात थकित अनुदान न मिळाल्यास योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दूध डेअर्‍यांनी दिला होता.मात्र, अनुदान दिले जाण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे योजना कायम राहिली. असे असूनही योजनेनुसार शेतकर्‍यांना डेअर्‍यांनी 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या दुधाला लिटरला 25 रुपये दर दिला. मात्र, पाच रुपयांचे अनुदान सरकारकडून न आल्यामुळे रक्कम अडकून पडली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात
आल्याची माहिती राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ आणि ‘चितळे दूध’चे संचालक श्रीपाद चितळे यांनी दिली.

सहकारी आणि खासगी दूध डेअर्‍यांची संयुक्त बैठक गुरुवारी (दि.6) रात्री झाली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला. सरकारने अनुदानाची पाच रुपयांची रक्कम थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करावी. त्याची सर्व माहिती पूर्वीप्रमाणेच सरकारला उपलब्ध करून देऊ. डेअर्‍यांना 10 सप्टेंबरपर्यंतचे दुधाचे अनुदान मिळाले आहे. पुढील आजपर्यंतचे अनुदान थकित असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पॉलिथीन बंद झाल्यास…

महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने प्लास्टिक उत्पादकांना विस्तारीत उत्पादक जबाबदारी अंतर्गत (ईपीआर) प्लास्टिकच्या पुनर्संकलनाची जबाबदारी दिलेली असून ही बाब अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावर संबंधित उत्पादकांवर कारवाई झालेली असून दुधाच्या पॉलिथीन पॅकिंग फिल्मचे उत्पादन 15 डिसेंबरपासून बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे पॉलिथीन ज्या दिवशी मिळणे बंद होईल, त्यावेळी दूधाचे पाऊच पॅकिंग करणे आपोआपच अडचणीत येणार असल्याचेही कुतवळ यांनी सांगितले.