दूध दराच्या प्रश्नावर राज्य सरकारचा तोडगा
मंत्री महादेव जानकर यांची विधानसभेत घोषणा
नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दूध दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने दूध भुकटीच्या निर्यातीसाठी ५० रुपये प्रति किलो तर दुधाच्या निर्यातीसाठी प्रति लिटर ५ रुपये अनुदान आणि शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या पोषण आहारात दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश केल्याची घोषणा पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी केली. तसेच तूप आणि लोण्यावरचा जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती करणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. विधानसभेत एका निवेदनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली.
राज्यात गेल्या काही महिन्यांपासून दूध दराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना १७ ते १८ रुपयांच्यावर दुधाला दर मिळत नाही. सरकारने गेल्याकाळात केलेल्या कुचकामी उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. त्यापार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलैपासून आंदोलन पुकारले आहे. संघटनेने मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागे झालेल्या सरकारने वायूवेगाने हालचाली सुरु केल्या आहेत. यासंदर्भात सोमवारी विधानसभेत लक्षवेधी चर्चेला आली होती. त्यावेळी विरोधीपक्षाच्या आमदारांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वंकष धोरण जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात यावर निर्णय जाहीर केला जाईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला मंत्री महादेव जानकर, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा
खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत राज्यातील दूध उद्योगापुढील अडी-अडचणी आणि दूध दराच्या प्रश्नावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. सध्या राज्यात अतिरिक्त दुधाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पुष्टकाळात अतिरिक्त दुधाची समस्या निर्माण होते. अतिरिक्त दुधाचा प्रश्न मार्गी लागल्यास दूध दराचा मुद्दाही आपोआपच मार्गी लागेल असा सूर बैठकीत व्यक्त झाला. त्यासाठी दूध भुकटीचा उपाय प्रभावी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. अतिरिक्त दुधाची भुकटी उत्पादीत केल्यास या समस्येतून मार्ग निघेल असा आशावाद आहे. सध्या जागतिक बाजारात भुकटीचे दर कमी आहेत. त्यामुळे भुकटीला निर्यात अनुदान मिळाल्यास निर्यातीला प्रोत्साहन मिळेल.
यावेळी शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यावरही चर्चा झाली. मात्र, राज्यात दररोज संकलित होणाऱ्या एकूण दुधापैकी सुमारे ३५ टक्के सहकारी दूध संघांकडून तर उर्वरीत ६० ते ६५ टक्के दूध हे खासगी संघांकडून संकलित होते. सहकारी दूध संघांकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध आहे. मात्र, खासगी संघांकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या माहिती उपलब्ध नाही. खासगी संघ हे गावा-गावातील एजंटांमार्फत दूध संकलन करतात. परिणामी त्यांच्याकडे शेतकऱ्यांची नोंद उपलब्ध नसते. शेतकऱ्यांना थेट अनुदान द्यायचे झाल्यास ही मोठी अडचण निर्माण होऊ शकते, अशी शंका बैठकीत व्यक्त करण्यात आली. त्यामुळे हा पर्याय प्रभावी उपाययोजना म्हणून योग्य ठरणार नाही असे मत पुढे आले.
अतिरिक्त दुधामुळे निर्माण झालेल्या दूध दराचा तिढा सोडवण्यासाठी भुकटीच्या उत्पादनाला चालना देऊन निर्यातीवर भर देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. त्यानुसार सहकारी आणि खासगी दूध संघांना दूध भुकटीची निर्मिती करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक किलो भुकटीसाठी प्रति किलो ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे. त्याचसोबत दूध निर्यात करणाऱ्या संघांनाही प्रति लिटर ५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.
शिवाय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग आदी विविध विभागांकडून पोषण आहार योजना राबविल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून पोषण आहार म्हणून दूध अथवा दुधाची भुकटी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय यावेळी घेण्यात आल्याचे मंत्री जानकर यांनी जाहीर केले. अशाप्रकारे अतिरिक्त दुधाची समस्या दूर होऊन शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल असा दावा केला जात आहे. दूध संघांना आणखी दिलासा देण्यासाठी तूप आणि लोण्यावरचा जीएसटी कर कमी करण्याची विनंती केंद्र सरकारला केली जाणार आहे.
