दुध डेअरींना तातडीने अनुदान द्या, अन्यथा आंदोलन!

0
राष्ट्रीय किसान सभेचा राज्य सरकारला इशारा
मुंबई : अलीकडेच दुधाच्या दरावरून राज्यभरात झालेल्या जन आंदोलनानंतर राज्य सरकारने प्रतिलिटर २५ रुपये दर देण्याची घोषणा केली होती. मात्र, ५० दिवस उलटूनही शेतकऱ्यांना वाढीव दर मिळाला नाही. यामुळे सरकारची वाढीव दराची घोषणा पोकळ ठरल्याची टीका महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी केली आहे. सरकारने अनुदान दिले नसल्याने दुध संघांनी १ ऑक्टोबरपासून दुध दरात ५ रुपये कपात जाहीर केले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने दुध डेअरींना १८० कोटींचे अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, सरकारने हे थकवलेले १८० कोटी रुपये दिलेले नाही. सरकारने तातडीने अनुदान न दिल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
काही महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी दुध दरासाठी राज्यभर आंदोलन केले होते. या आंदोलनात दूध रस्त्यावर ओतले होते. यामुळे त्या आंदोलनाची देशपातळीवर दखल घेतली गेली. यावेळी राजू शेट्टी यांनी मुंबईचा दुधपुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला होता. यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर दुधाला प्रति लिटरमागे 25 रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. मात्र, सरकारने अजूनही अनुदान दिले नसल्याने दुध संघ अडचणीत आले आहेत. परिणामी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.