दुध समजून किटकनाशक पिणार्‍या बालकाचे वाचले प्राण

0

अमळनेर। दूध समजून किटकनाशकातील रिकाम्या बाटलीतील पाणी प्यायल्याने, तब्बल 15 दिवस बेशुद्धावस्थेत राहिलेला साडेचार वर्षाचा बालक डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे मृत्युच्या दाढेतून सुखरूप बाहेर आला. ही कहाणी आहे, सुनील भटू बडगुजर यांच्या साडेचार वर्षाच्या एकुलत्या एक समाधान नावाच्या बालकाची. सुनील बडगुजर हे अमळथे (ता.शिंदखेडा) येथील रहिवाशी आहेत. गेल्या 7-8 वर्षापासून ते कळमसरे येथे सालदारकी करतात. कळमसरे ग्रामसचिवालयाच्या इमारतीच्या पाठीमागे सुरेश बडगुजर यांच्या मालकीच्या घरात ते भाडेकरू म्हणून राहतात. समाधान हा घराबाहेर खेळत असतांना, त्याला अंगणात किटक नाशकाची खाली बाटली मिळाली. त्याने बाटलीत माठातील पाणी ओतले असता, दुधासारखा फेसाळ द्रव बाटलीतून पडू लागला. ते दूध आहे, असे समजून समाधानने ते प्राशन केले.

डॉ. शिंदे यांनी बिलात केली 50 टक्के सुट
दुध समजवून औषध पिल्यानंतर काही क्षणात त्याच्या तोंडाला फेस येवून तो बेशुद्ध पडला. उपचारासाठी त्याला अमळनेरातील डॉ.अनिल शिंदे यांच्याकडे दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने, कुटुंबियांची आशा संपली होती. समाधान मृत्यूशी झुंज देत होता. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने, बडगुजर समाज बांधवांनी लोकवर्गणी जमा केली, आमदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, यांच्यासह अमळनेर, कळमसरे, मारवड, धुळे, एरंडोल, पारोळा, शिंदखेडा येथील बडगुजर समाज बांधवांनी आर्थिक मदत केली. बालकाची स्थिती व मदतीचा ओघ बघून डॉ.अनिल शिंदे यांनीही शर्थीचे प्रय करून त्याचे त्याचे प्राण वाचविले. 21 व्या दिवशी समाधान याने डोळे उघडले. डॉ.शिंदे यांनी वैद्यकीय बिलात 50 टक्के सुट दिली. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाले आहे.