दुप्पट परताव्याच्या आमिषाने 32 लाखाला गंडविले

0

निगडी : ‘मी दिल्लीतील नॉन बॅकिंग फायनाशियल कॉर्पोरेशन फायनान्स कंपनीचा एजंट असून आर्थिक गुंतवणूक केल्यास एका वर्षात दुप्पट परतावा देतो’ असे अमिष दाखवून एका तरूणाला 70 वर्षाच्या एजंटने तब्बल 32 लाखांना गंडविले. हा प्रकार पुर्णानगर येथे नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी सचिन मोरे (वय 38, रा. पुर्णानगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी ज्येष्ठ नागरिकाने फिर्यादीला ‘मी दिल्लीतील नॉन बॅकिंग फायनाशियल कॉर्पोरेशन फायनान्स कंपनीचा एजंट’ आहे. आर्थिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका वर्षात दुप्पट परतावा देतो, असे अमिष दाखविले. या अमिषाला बळी पडून मोरे यांनी रोख व धनादेशाव्दारे एकूण 43 लाख 25 हजार रूपयांची गुंतवणूक केली. आरोपीने मोरे यांना नफा झाल्याचे सांगून दोन टप्प्यामध्ये 10 लाख 95 हजार रूपये दिले. त्यानंतर आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. मोरे यांनी गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली. आरोपीने वेळोवेळी आश्‍वासन देत पैसे न देता तब्बल 32 लाख 30 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.