बारामती । बारामती तालुक्यात साडे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली. त्यातच पावसाची निश्चितता नसल्याने कमी पाण्यावर येणार्या पिकांचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार मका, सोयाबिन, बाजरी, कांदा व कडधान्याची लागवड करण्यात आली. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवडयात चांगल्या प्रकारे पाऊस झाला. मात्र मधल्या 20 दिवसात पावसाने चांगलीच ओढ दिली. ती अद्यापही कायम असल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. बारामती तालुक्याच्या जिरायती पट्ट्यात रब्बी हंगाम मुख्य मानला जातो. जर खरीपास दुबार पेरणी केल्यास रद्दी लागवड करता येत नसल्याने दुबार पेरणीकडे शेतकर्यांनी पाठ फिरवली आहे, असे तालुका कृषी अधिकारी संतोष कुमार बरकडे यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपुर्वी बारामती तालुक्यातील लोणीभापकर, ढाकाळे, मुढाळे, पळशी, मासाळवाडी या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील खरीप पिकाला चांगलाच आधार मिळाला. खरीप पिकाची हमी या पावसामुळे निश्चित मानली जात आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. या परिसरात झालेल्या पावसामुळे शेतकर्यामध्ये समाधानाची भावना पसरली आहे. तसेच या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत थोडी वाढ झाली आहे.
बाजरीची जास्त पेरणी
यंदाच्या खरीप हंगामात बाजरीची तालुक्यात सर्वात जास्त पेरणी झाली असून जवळपास 10 हजार हेक्टरवर ही पेरणी झाल्याची शक्यता आहे. खरीप हंगाम हा जिरायती भागाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या खरीप हंगामावर या 42 गावातील शेतकर्यांचे अर्थशास्त्र ठरत असते. मुलांचे शिक्षण वर्षभराच्या गरजा लग्नसराई यासाठी होणारा खर्च हा या हंगामावरच अवलंबून असतो. मागील चार वर्षात खरीपाचा हंगाम वाया गेल्याने शेतकर्यांचे अर्थशास्त्र कोसळले होते.