पुणे । महामार्गावर अपघात होऊ नये यासाठी दुभाजक टाकलेले असतात. हे दुभाजक तोडून त्यातून अवैध वाहतूक होत असल्याने अपघात होतात. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागतात. अनधिकृतपणे दुभाजक तोडणार्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी बुधवारी केली.
महामार्ग तसेच जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर योग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. महामार्ग पोलिस अधीक्षक अमोल तांबे, प्रादेशिक परिवहन अधिकारी बी.आय.आजरी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक सी. डी. फकीर, महानगरपालिका मुख्य अभियंता राजेंद्र राऊत, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. जी. मुनगिलवार, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांच्यासह आरोग्य विभाग, मार्ग परिवहन महामंडळ, वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
रस्त्यांचे सेफ्टी ऑडीट
कात्रज-कोंढवा रस्त्याचे कामकाज तातडीने पूर्ण करा, पावसाळ्यात रस्ता सुरक्षा उपाययोजना अंमलात आणणे, अपघात प्रवण क्षेत्रात विविध सुरक्षाविषयक कामे करणे, जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यांचे सेफ्टी ऑडीट करणे, महामार्गावरील खड्डे बुजवणे, वाहतूक सुरक्षा सूचनांचे फलक सुस्थितीत ठेवणे, महामार्गावरील प्रसाधानगृहे स्वच्छ ठेवणे, वारंवार अपघात होणार्या प्रमुख रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून त्यावर योग्य ती उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी संबधित अधिकार्यांना दिले.