Up Nagpur-Mumbai Duronto Express mobile phone of ticket inspector stolen : accused in Jalgaon Lohmarg in police net भुसावळ : अप नागपूर-मुंबई दुरांतोतून तिकीट निरीक्षकाचा मोबाईल लांबवणार्या भामट्याच्या लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गिरीश उर्फ रोहित दत्ता चौगुले (19, प्रजापत नगर, पवन नगर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्यास न्यायालयाने 19 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
भुसावळ स्टेशन सुटताच लांबवला मोबाईल
तक्रारदार भगतसिंग सुरजसिंह चंदेल हे तिकीट निरीक्षक असून 30 ऑगस्ट रोजी 12290 नागपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये कर्तव्यावर असताना प्रवाशांकडील तिकीटांची तपासणी करीत असताना 22 वर्षीय तरुणाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला होता. बोगी क्रमांक एस- 4 मध्ये भुसावळ स्थानक सोडल्यानंतर ही घटना घडली होती. या प्रकरणी मुंबई येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळात वर्ग करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून आरोपी जाळ्यात
पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अजित तडवी, जगदीश ठाकूर, धनराज लुले, दिवाणसिंग राजपूत, सागर खंडारे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे जळगावच्या गांधी मार्केट भागातून आरोपी रोहित चौगुलेला अटक केली. आरोपीच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरीस गेलेला 19 हजारांचा मोबाईल तसेच अन्य 12 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तपास उपनिरीक्षक साळुंके करीत आहेत.