दुरुस्तीदरम्यान सिग्नल मिळाल्याने सुरू झाले इंजिन; कर्मचारी बचावला

0

रेल्वे कर्मचार्‍याने गाडीखाली झोपून वाचवला जीव ; घटना मोबाईलमध्ये कैद

भुसावळ- रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास आझाद हिंद एक्स्प्रेसच्या इंजिनाची दुरूस्ती सुरु असताना हिरवा सिग्नल मिळाल्याने चालकाने गाडीचे इंजिन सुरु केले. त्यावेळी इंजिनाच्या खाली दुरुस्ती करणारे रेल्वे कर्मचारी दीपक पाटील यांनी गाडी खाली झोपून स्वत:चा जीव वाचवला. या घटनेचे अनेक जणांनी मोबाईल चित्रिकरण केले. सोमवारी रात्री रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तीनवर 9.45 वाजता आझाद हिंद एक्स्प्रेसचे आगमन झाले. गाडीच्या इंजिनात दुरूस्तीचे काम असल्याने एमओएच शेडमधील कर्मचारी दीपक पाटील इंजिनाच्या खाली गेले होते. त्यांचे सहकारी उमेश जोशी पाटील यांना टॉर्चने प्रकाश दाखवत होता. पाटील बाहेर निघण्याच्या तयारीत असताना गाडीला सिग्नल मिळाल्याने चालकाने हॉर्न वाजवत इंजिन सुरु केले. गाडी सुरू झाल्याने पाटील यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांनी थेट गाडीखाली रुळांमध्ये झोपून घेतले. त्यामुळे धावपळ उडाली. संपूर्ण गाडी गेेल्यानंतर पाटील सुखरुप उठून उभे राहिले.

रेल्वे गाडी सुरू झालीच कशी?
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी रेल कामगार सेनेचे अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी डीआरएम यादव यांच्याकडे केली. रेल्वे कर्मचारी इंजिनाखाली काम करीत असताना गाडी सुरू झालीच कशी? असा मुद्दा यावेळी कर्मचार्‍यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या जातील, असे डीआरएम यादव यांनी सांगितले.