मुंबई । महापालिकेने दोन वर्षांपूर्वी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, दोन वर्षांतच येथे अनेक समस्या वाढल्या असून, दुरुस्तीचे हे पैसे नक्की गेले कुठे, असा जाब विचारत या कामांची चौकशी करावी तसेच संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी भाजपने सुधार समितीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे लावून केली. मात्र, प्रशासनाला यावर खुलासा करता न आल्याने हा मुद्दा राखून ठेवण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला.
2 वर्षांपूर्वी झालेली दुरुस्ती
दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विलेपार्ले नाट्यगृहाचे मोठ्या दिमाखदार पद्धतीने उद्घाटन झाले होते. दोन वर्षांनंतर येथील मंडई, शौचालय, नाट्यगृहांमध्ये विविध समस्या निर्माण झाल्या आहे. सुधार समितीच्या पाहणीनंतरही अद्याप समस्या सुटलेल्या नाहीत. घाणेरडी शौचालये, दरवाज्यांच्या कड्या तुटल्या आहेत. लाद्याही निखळलेल्या आहेत. शौचालयांची सफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली असते. व्यापार्यांना याचा प्रचंड त्रास होत असल्याचा आरोप करत, भाजपच्या सदस्या ज्योती अळवणी यांनी बुधवारी सुधार समितीत आलेल्या विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर महापालिका मंडईच्या परिस्थितीबाबत मुद्दा उपस्थित केला.
14 कोटींचा हिशेब द्या!
पालिकेने नाट्यगृह व मंडईच्या दुरुस्तीसाठी 14 कोटी खर्च केले. मात्र, समस्यांचे ग्रहण सुटलेले नाही. प्रशासनाकडून याबाबत दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे कामांची चौकशी करावी, अशी जोरदार मागणी अळवणी यांनी केली. भाजपचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश गंगाधरे त्यांना पाठिंबा देत, सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाला लक्ष्य केले. पालिकेने दुरुस्तीवर केलेल्या खर्चाचा ताळेबंद सादर करावा, अशी मागणी गंगाधरे यांनी लावून धरली. पालिकेला मंडई व नाट्यगृहांची देखभाल करण्याची भूमिका शिवसेनेने मांडली.
‘टाइमपास’वरून ‘हंगामा’
नाट्यगृहाची दोन वर्षातच दुरवस्था झाल्याने कामांची चौकशीची मागणी भाजपने केली. चौकशीची आयुक्तांनीच हमी द्यावी, असा रेटा लावला. यावेळी संतापलेल्या अध्यक्ष नर यांनी अध्यक्षांच्या अधिकारांची आठवण करुन देत टाइमपास का करताय, असे खडे बोल भाजपला सुनावले. टाइमपास या शब्दावर गंगाधरे यांनी आक्षेप घेतल्याने सभेत हंगामा झाला. मात्र, अन्य सदस्यांनी साथ न दिल्याने ते एकाकी पडल्याचे दिसून आले.