दुर्गंधीयुक्त पाणी नाल्यात साचल्याने वरणगावकरांचे आरोग्य धोक्यात

0

नवीन पूलाचे फाऊंडेशन प्रवाहापेक्षा वर ; पाणी वाहुन जाण्यास निर्माण झाली अडचण

वरणगाव- शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पश्चिमेस असलेल्या नैसर्गिक पाणी वाहुन नेणार्‍या नाल्यामधे विकसीत कॉलन्यांचे सांडपाणी वळविण्यात आले आहे मात्र पालिकेने नाल्यावर प्रतिभानगरला जोडण्याकरीता बांधकाम केलेल्या पुलाचे काँक्रिट फाऊंडेशन कंत्राटदारांने पाण्याच्या प्रवाहापेक्षा उंच बांधकाम केल्यामुळे दुर्गंधीयुक्त सांडपाणी साचल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

कंत्राटदारासह बांधकाम अभियंत्यांची बेफिकीरी
शहर परीसराच्या डोंगराळ भागातून पूर्वीपासुन नैसर्गिकरीत्या पाच नाल्यांची निर्मिती झाली आहे मात्र शहराच्या वाढत्या विस्तार दृष्टीकोनातून चार नाले नामशेष झाले असून एक नाला नैसर्गिकरीत्या नागेश्वर महादेव मंदिर जूने मकरंदनगर, नवीन मकरंद नगर, कृषी उत्पन्न बाजार समिती, आई हॉस्पिटल प्रतिभा नगर, दलितवस्ती आंबेडकर नगरमार्गे भोगावती नदीपात्रापर्यंत कागदोपत्री दिसून येते. या नाल्यावरील जुना कालबाह्य झालेला आई हॉस्पीटलजवळील पूल पाडून नवीन पूलाचे नियोजन करून बांधकाम करण्यात आले मात्र नगरपालिकेचे बांधकाम अभियंत्यांचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार यांच्या निष्काळजीपणामुळे पूल बांधणीचे फाऊंडेशन पाणी प्रवाहाच्या दोन फुटावर बांधकाम केल्यामुळे नैसर्गिक पाणी वाहून नेणार्‍या नाल्यात वळविलेले नागरी वस्त्यांचे सांडपाणी मागील वर्षापासून साचत आहे. साचलेल्या सांडपाण्यात जलपर्ण आणि इतर वनस्पती उगल्या आहेत त्यामुळे पाण्याचा उग्र वास येत आहे आणि डासांच्या उत्पत्तीत वाढ झाली आहे. निसर्गाचे अधिकचे तापमान आणि डासांच्या त्रासाने नागरीक हैराण झाले असून नगरपालिकेने साचलेले लाखो लीटर सांडपाणी नदीपात्रात वाहते करावे, अशी नागरीकांची मागणी होत आहे.

सांडपाणी वाहण्याबाबत दखल घेणर -नगराध्यक्ष सुनील काळे
नाल्यामध्ये साचलेले सांडपाणी वाहू जाण्याकरीता कर्मचार्‍यांना सूचना केली जाईल. यापुढे कोणत्याही नाल्यात सांडपाणी साचणार नाही याची खबरदारी नगरपालिका घेणार आहे. सांडपाणी वाहुन जाण्याकरीता योग्य पर्याय निवडला जाईल, असे नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले.

प्लॅननुसार पुलाचे काम -कंत्राटदार
प्रतिभानगराला जोडणार्‍या नात्यावरील पूलाचे बांधकाम अधिकार्‍यांचा नजरेखाली केलेले आहे. पूलाचे फाऊंडेशन प्लॅननुसार तयार केले आहे. पालिकेने वेळो-वेळी नाल्याची स्वच्छता केलेली नसल्याने व या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नाल्यात सांडपाणी साचत असल्याचे पूल बांधकाम कंत्राटदार -शे. कलिम म्हणाले.