दुर्गम भागात नागरिक लसपासून वंचित 128 पैकी 125 गावांमध्ये लसीकरण टप्प्याटप्प्यात सुरू

तळोदा। तालुक्यातील 128 गावांपैकी  अत्यंत दुर्गम असणार्‍या  चिलीपाणी, वरपाडा, देवटेंबा अशा दुर्गम भागातील तीनही गावापाड्यात लसीकरण झालेले नसल्यने नागरिक त्यापासून वंचित राहिले आहेत. तालुक्यातील इतर 125 गावांमध्ये लसीकरण टप्प्याटप्प्यात सुरू आहे. तळोदा तालुक्यातील लसीकरणात आष्टे, (मोड) 83 टक्के लसीकरण झाले आहे. तसेच जुने सिलिंगपूर, तळवे, रांझनी, कढेल, खरवड, धानोरा, मोरवड, गोपाळपूर पुर्नवसन ही गावे लसीकरणात अग्रभागी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरातील नागरिक घेताहेत ग्रामीण भागात लस
उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी  गर्दी असल्याने तसेच नोंदणी करतांना ऑनलाईन लवकर नंबर लागत नसल्याने शहरातील अनेकांनी ग्रामीण भागातील लसीकरण केंद्राकडे मोर्चा वळविला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात असणार्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी नागरिक गर्दी
करीत आहेत.
नेटवर्क मिळत नसल्याने अडचणी
तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरणाबद्दल गैरसमज अजूनही दूर झालेले नाही. ते दूर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्यामुळे आवश्यक व अपेक्षित टक्केवारी वेगाने वाढताना दिसून येत नाही. उत्तर भागात अनेक गावांना नेटवर्क अडचणींमुळे नोंदणी करतांना अडचणी येत आहेत. तसेच मोबाईलमधून नोंदणी कशी करतात, याचे ज्ञान अनेकांना नसल्याने नोंदणी कशी करतात हे समजत नाही. तळोदा नव्हे तर अक्कलकुवा, धडगाव भागात हीच स्थिती आहे. अक्कलकुवाचे  नागेश पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत दुर्गम भागात नेटवर्क मिळत नसल्याने लसीकरणाला अडचणी येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग शोधण्याची मागणी केली आहे.
सरपंचानी पुढाकार घेण्याचे आवाहन
उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी सरपंचानी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. लसीकरणाबाबत तालुक्यातील सरपंच/प्रशासक यांच्यासोबत कोरोना परिस्थिती व्यवस्थापन, उपाययोजना व लसीकरणाबाबत बैठक आयोजित केली होती. यावेळी पं.स. सदस्य यशवंत ठाकरे, सदस्य दाज्या पावरा, सोनिबाई पाडवी, तहसीलदार, गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी शाहूराज मोरे यांनी कोरोना आजाराबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्या, विलगीकरण, वेळेत उपचार, लसीकरण आदीबाबत माहिती दिली. कोरोना आजार व लसीकरणाबाबत गैरसमज, बोगस डॉक्टर आदींपासून जनतेस परावृत्त करण्याचे आवाहन केले.  बैठकीत तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण यांनी लसीकरणाबाबत तालुक्यातील प्रगती, लसीकरण केंद्रे, गावनिहाय नियोजन व लसीकरणाचे महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली. सभापती यशवंत ठाकरे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांनी पुढाकार घेऊन गावोगावी लसीकरण कॅम्प आयोजित करण्याचे आवाहन केले. पं.स. सदस्य सोनिबाई पाडवी यांनी बचत गटातील महिलांना सोबत घेऊन जनजागृती करण्याचे आवाहन केले.