कल्याण । कल्याणमधील शिवकालीन इतिहासाची साक्ष सांगणार्या शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजालगतच्या तटबंदीच्या भिंतीना तडा व भिंतीचे दगड ढासळू लागले आहेत. त्यामुळे दुर्गाडी किल्ल्याला धोका निर्माण झाला आहे. पुरातत्व विभाग तसेच जिल्हाधिकार्यांकडे किल्ल्याच्या डागडुजीसाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवप्रेमीमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच बुधवारी पुन्हा मागील बाजूची भिंत ढासळल्याने किल्ल्याचा धोका आणखी वाढला आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची मुहूर्तमेढ कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी रोवली. कल्याण शहराच्या प्रवेशद्वारावर दुर्गाडी किल्ला मोठ्या दिमाखाने उभा असून हा शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा दुर्गाडी किल्ला कल्याण शहराचे वैभव आहे. मात्र, गत वर्षांपासून ऐतिहासिक कल्याण शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीना तडा गेल्या आहेत, तर काही ठिकाणी तटबंदीच्या भिंतीचे दगड ढासाळू लागल्याने किल्याला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज कोसळून वृक्ष पडल्याचे कळताच माजी शहरप्रमुख रवींद्र कपोते यांनी धाव घेतली आहे. देखभाल दुरुस्ती सुरू न केल्यास येत्या सोमवारपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे किल्ल्याच्या पडझडीवरून वातावरण तापले आहे.
मागील महिन्यांत ढासळला होता बुरूज
गेल्याच महिन्यात दुर्गाडी किल्ल्याचा एक बुरुज ढासळला होता. या घटनेस महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच पुन्हा मागील बाजूस असलेल्या दुसर्या बुरुजाचा भाग कोसळला आहे. इतकेच नव्हे, दुर्गाडी देवीच्या मंदिराचा पाया खचला असून बाजूचा वृक्ष कोलमडून पडला आहे. मंदिरात पावसात पाणी गळत राहते. या शिवकालीन किल्ल्याची पडझड थांबवण्यासाठी पुरातत्व विभाग जिल्हा प्रशासनाकडून काहीच ठोस उपाययोजना होत नसल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
शासनाच्या आर्थिक अर्थसंकल्पात गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद केली जात असते. विधान परिषदेचे आमदार जगन्नाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीकडे शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीबाबत पाठपुरावा केला होता तसेच अधिवेशनात औचित्याचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र कागदी घोडे नाचवण्यापलीकडे शासनाकडून काहीच कार्यवाही न झाल्याने दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांचे दुरुस्ती काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहे. काही दिवसांपासून सातत्याने पाऊस असून तो थोडा कमी होताच लगेचच कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जे एन गांगुर्डे यांनी सांगितले.
महापौरांनी केली पाहणी
दुर्गाडी किल्ल्याची मागील बाजूची भिंत ढासळल्याची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी किल्ल्याची पाहणी केली. दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पुरातत्व विभागाने कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे सुपुर्द करावे, अशी मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी राज्य शासनाकडे केली असल्याचे सांगितले.