ठाणे । कल्याणमधील दुर्गाडी खाडीपुलाला समांतर पूल बांधण्याचे काम पूर्ण होण्याची डेडलाइन जवळ येत असताना प्रत्यक्षात या कामाची कुर्मगती आणि तांत्रिक अडथळ्यांमुळे हे काम किमान वर्षभराने लांबणीवर पडणार आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात त्यासाठी किमान मे 2019 उजाडेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कल्याणात दुर्गाडी पुलावर उद्भवणारी वाहतूककोंडीची समस्या या दरम्यान अशीच सुरू राहील. कल्याण व डोंबिवलीतील वाहतूककोंडीची समस्या दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले दुर्गाडी समांतर पूल, डोंबिवली पश्चिमेकडील मोठागांव ते भिवंडीतील मानकोलीपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी पुलांच्या कामांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या जानेवारी 2016मध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीने मंजुरी दिल्यावर वाजतगाजत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले. कल्याणातील वाहतूककोंडीचा त्रस्त अनुभव स्वतः फडणवीस यांनी निवडणुकीआधी घेतला होता, त्यावेळी दुर्गाडी पुलावरील कोंडीमुळे त्यांना दुचाकीवरून प्रवास करावा लागला होता. याची आठवण त्यावेळी त्यांनी जाहीरपणे व्यक्त करत दुर्गाडी समांतर पुलाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. हा खाडी पूल 25 मीटर रुंद व 380 मीटर लांब असेल. त्यासाठी 76 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
पुलाबाबत काही आक्षेप
सध्या दुर्गाडी पुलावर एखादे वाहन बंद पडले की वाहनांची प्रचंड कोंडी होते. काहीवेळा आग्रा रोड व कल्याण-नांदेड या राष्ट्रीय महामार्गावरही या कोंडीचा त्रास जाणवतो. त्यामुळे ही समस्या कायमची निकाली काढण्यासाठी या पुलाची नितांत आवश्यकता आहे. कोन व कल्याण अशा दोन्ही बाजूंनी काम सुरू असल्याने ते वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कल्याण खाडीतील प्रस्तावित जलवाहतुकीच्या प्रकल्पामुळे मेरिटाइम बोर्डाने या खाडीकिनारीच्या पुलाबाबत काही आक्षेप घेतले होते.