भुसावळात पोटविडणुकीत राष्ट्रवादी उमेदवाराशी सरशी ः सेना उमेदवाराचे डिपॉझिट जप्त
भुसावळ : शहरातील 24 अ साठी झालेल्या पोटनिवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार दुर्गेश ठाकूर यांना दुसर्यांदा संधी देत 862 मतांनी विजयी केले तर प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार रेखा सोनवणे यांना एक हजार 429 मते मिळवून पराभूत झाल्या तर सेनेचे उमेदवार विक्की चव्हाण यांचे डिपॉझिट जप्त झाले. विशेष म्हणजे जात प्रमाणपत्राअभावी ठाकूर अपात्र झाल्याने या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यात आली तर मतदारांनी पुन्हा त्यांना निवडून दिले. विजयानंतर समर्थकांनी ठाकूर यांना खांद्यावर घेत जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
अवघ्या 20 मिनिटात निकाल
गुरूवारी मतदान झाल्यानंतर शुक्रवारी प्रांत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सूलाणे, सहायक अधिकारी करूणा डहाळे यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरूवात झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात निकाल हाती आले. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रेखा सोनवणे यांना एक हजार 429 मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दुर्गेश ठाकूर यांना दोन हजार 291 मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार विक्की चव्हाण यांना अवघ्या 90 मतांवर समाधान मानावे लागले. यात 67 मतदारांनी नोटाचा पर्याय स्वीकारला. ठाकूर विजयी झाल्यावर मतमोजणी कक्षातच त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त राखला.
गुलालाची उधळण अन् जल्लोष
पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार दुर्गेश ठाकूर विजयी झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी व मित्रांनी त्यांना खांद्यावर बसवून त्यांची मिरवणूक काढत गुलालाची उधळण करून जल्लोष केला. रस्त्याने जातांना मोटर सायकल रॅली काढण्यात आली. माजी आमदार संतोष चौधरी, अनिल चौधरी, सचिन चौधरी, नितीन धांडे आदी पदाधिकार्यांनी ठाकूर यांचा सत्कार केला.