दुर्दैवी घटना: जळगावात जन्मदात्या पित्याकडून ७ वर्षाच्या मुलीची हत्या !

0

जळगाव: येथील तालुका पोलीस स्टेशनच्या मागे निमखेडी शिवारात वास्तव्यास असलेल्या संदीप चौधरी याने आपल्या सात वर्षीय मुलीची हत्या करून बांभूरी पुलावरून फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. आज गुरुवारी सकाळी ही घटना समोर आली. कोमल संदीप चौधरी असे मयत मुलीचे नाव आहे. दरम्यान पोलिसांनी मुलीच्या वडिलाला पारोळा येथून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली.

बापानेच मुलीची हत्या करून पत्नीला फोन करत मुलीची हत्या केल्याची माहिती दिली. स्वत: आत्महत्या करणार असल्याचेही संदीपने पत्नीला सांगितले. मात्र त्याला पोलिसांनी पारोळा येथून ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलाभ रोहम, भाग्यश्री नवटक्के, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निर्क्षक बापू रोहम यांनी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

काल बुधवार रात्रीपासून कोमल आणि तिचे वडील संदीप हे बेपत्ता होते. त्यानंतर कोमलच्या मामा आणि काकाकडून दोघांचा शोध सुरु झाला. मात्र रात्रभर ते सापडले नाही. दरम्यान आज गुरुवारी सकाळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती कोमलच्या मामाला आणि काकाला दिली. मुलीला मामाने ओळखले आहे. पुढील चौकशी पोलिसांकडून सुरु आहे.