दुर्मिळ पुस्तकांचे ठाण्यात डिजिटलायझेशन झाले सुरु

0

ठाणे । ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयातील 1777 दुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनला सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते सोमवारी त्याचे औपचारिक उद्घाटन मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले. ग्रंथ संग्रहालयातील उर्वरित सर्व ग्रंथांचे डिजिटायझेशन करणे तसेच या पुस्तकांची दर्जेदार वेबसाइट आदींसाठी देखील जिल्हा प्रशासनातर्फे आर्थिक सहाय्य केले जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

लाखाचा निधी तातडीने उपलब्ध
जिल्ह्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून हा आगळावेगळा उपक्रम जिल्हाधिकार्‍यांनी हाती घेतला असून त्यांनी पदभार घेताच ग्रंथसंग्रहालयाची ही मागणी मान्य करून 50 लाखाचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ अश्‍विनी जोशी यांनी यापूर्वी अशा प्रकारे डिजिटायझेशन करण्यास अनुकुलता दर्शविली होती.

विविध पुस्तके उपलब्ध
ग्रंथालयात सध्या 1777 दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. दुर्मिळ पुस्तकांची एकूण पृष्ठसंख्या 2,90,710 आहे. 18 लाख पानांच्या या पुस्तकांमध्ये 344 काव्याशी संबंधित, 228 नाटकाची, 194 इतिहासाची, 178 निबंधाची, 149 चरित्र, 143 कादंबर्‍या, 77 संकीर्ण, अध्यात्माची 51,धर्मावर आधारित 52 तर वैद्यक 51 तसेच गणितशास्त्राची 44, पौराणिक 41, 16 शब्दकोश आदी प्रकारची पुस्तके असून त्यांचे डिजिटायझेशन होणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांची सूचना
दुर्मिळ ग्रंथ ऑनलाइन सहज उपलब्ध राहावेत तसेच जगातील कुठल्याही कोपर्‍यातून ही संपदा महाजालावर सहज शोध घेता यावी व वाचायला मिळावी तरच याचा हेतू साध्य होईल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ कल्याणकर यांनी केली. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, संस्थेचे प्रभारी अध्यक्ष संजीव ब्रह्मे, उपस्थित होते.