पुणे । टोटल अॅनोमलस पल्मनरी व्हेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) हा अत्यंत दुर्मिळ हृदयरोगाने पीडित असलेल्या सावली आंबिलढगे या 2 वर्षीय मुलीवर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. त्यामुळे तिला नवसंजीवनी मिळाली असून तिच्या पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
श्वसनाचा गंभीर त्रास
सावलीला 3 महिन्यांपूर्वी श्वसनाचा गंभीर त्रास होऊ लागला आणि तो वाढतच गेला. बीड येथील रहिवासी असलेल्या सावलीचे वजन केवळ 7 किलोग्रॅम होते आणि डोळे व नखांमध्ये निळसर झाक होती. या मुलीवर शस्त्रक्रिया आवश्यक होती आणि ती शासकीय आरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आली आणि ऑपरेशनच्या 7 दिवसानंतर त्या मुलीस सुखरूप सोडण्यात आले.
ऑक्सिजनयुक्त रक्ताची शरीरात कमतरता
सह्याद्री हॉस्पिटलच्या डेक्कन जिमखाना शाखेत तिच्या आजाराचे पहिल्यांदा 2 डी इकोद्वारे निदान करण्यात आले. तिला टोटल अॅनोमलस पल्मनरी व्हेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) हा दुर्मिळ आजार झाला होता. हा आजार जन्मजात दोष असलेल्या 10,000 पैकी 3 मुलांमध्ये आढळतो आणि त्यावर तत्काळ उपचार आवश्यक असतात. मुलीच्या हृदयातील एक कप्पा विकसित झाला नव्हता आणि तिच्या हृदयात एक मोठे छिद्र आढळून आले. याशिवाय, फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नव्हते. आणखी एक गुंतागुंत अशी होती, की फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून येणारी रक्तवाहिनी हृदयातील ऑक्सिजनयुक्त न झालेल्या रक्त असलेल्या कप्प्याशी संलग्न होती. यामुळे अशी स्थिती निर्माण झाली, की तिच्या संपूर्ण शरीरात मिश्र रक्त फिरू लागले आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजनयुक्त (शुद्ध) रक्ताची तूट निर्माण झाली होती.
चार तास चालली शस्त्रक्रिया
आपल्या कुशल तज्ज्ञांच्या मदतीने सह्याद्री हॉस्पिटलमधील डॉक्टरांना हृदयात नवीन कप्पा तयार करण्यासाठी आणि फुफ्फुसातून ऑक्सिजनयुक्त रक्त घेऊन येणार्या रक्तवाहिन्या तिकडे वळविण्यासाठी व नंतर संपूर्ण शरीरात नेण्यासाठी जवळजवळ 4 तास लागले. अत्यंत दुर्मीळ शस्त्रक्रिया केल्यानंतर अतिदक्षता विभागात (आयसीयू) 2 दिवस घालविल्यानंतर या मुलीला एका आठवड्याने सोडण्यात आले.
विनामूल्य शस्त्रक्रिया
शासकीय आरोग्य योजनेमुळे ही शस्त्रक्रिया सह्याद्री हॉस्पिटलमध्ये विनामूल्य करण्यात आली. कार्डियाक सर्जन डॉ. महेंद्र बाफना, कार्डिअॅक अॅनेस्थेटिस्ट डॉ. शंतनु शास्त्री आणि अन्य वैद्यकीय टीमच्या सदस्यांचा समावेश असलेल्या सह्याद्री हॉस्पिटलच्या वैद्यकीय टीमने ही कामगिरी केली. बालरोगतज्ञ डॉ. प्रशांत खांडगवे यांनीही शस्त्रक्रियेनंतरच्या शुश्रुषेत महत्त्वाची भूमिका बजावली.