तळोदा । दामोदर नगर परिसरातील मुख्य लाईनच्या विद्यूत तारा वार्यामुळे अचानक तुटून पडल्याने उच्च दाबाचा विद्युत पुरवठा निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे इलेक्ट्रिनिक उपकरणे जळून आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा होऊन मदत मिळावी तसेच लाईन तात्काळ शिफ्ट व्हावी अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, दामोदर नगर परिसरात सकाळी 10:30 वाजेचा सुमारास वार्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गावठाणकडे जाणारी मुख्य लाईन 11 केव्हीएलटी लाईनचा विद्युत पोलला स्पर्श झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन लघुदाबाच्या लाईनीवरती पडल्यामुळे परिसरात उच्च दाबाचा विद्युत पुरवठा निर्माण होऊन परिसरातील नागरिकांचे मौल्यवान इलेक्ट्रिक साहित्य जळाल्याने आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली. यात गोकुळ बन्सीलाल मिस्त्ररी यांचा पंखा, मनिषा बापू शिवदे, यांचा टीव्ही, पंखे, दिलीप ताराचंद मराठे यांचे फ्रिज, टीव्ही, सतीश पाठक यांचे विद्युत मीटर, ताराचंद पुडंलीक वाघ यांचे पंखे तर परिसरातील अनेकांचे विद्युत मिटर व मौल्यवान उपकरणे जळून खाक झाले आहेत. या पूर्वी देखील दामोदर नगर परिसरात अनेकदा असे प्रकार घडून आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही संबंधीत विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
शिफ्टिंगची कामे प्रगती पथावर
सदर प्रकारानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी वीजवितरण विभागाला दूरध्वनीद्वारे कळविले. शहराचे सहायक अभियंता इम्रान पिंजारी, लाईन स्टाप आदींना घटनास्थळी भेट देऊन तुटलेले तारा जोडून विद्युत पुरवठा सुरळीत केला. दि 24 एप्रिल रोजी देखील दामोदर नगर परिसरात सामाजिक वनीकरण विभागामार्फत तयार करण्यात येत असलेल्या नर्सरीच्या कच्चा रस्त्या दरम्यान लोंबकळणार्या तारांना ट्रॅक्टर स्पर्श होऊन वाहनांचे टायर जळून खाक झाल्याची घटना घडली होती. पाहणी दरम्यान आलेले सहाय्यक अभियंता सचिन काळे यांना घेराव घालून तात्काळ परिसरातील तारा शिफ्टिंग करून लोंबकळणारा तारा उंच करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सध्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानात शिफ्टिंगचे कामे प्रगती पथावर असल्याचे संबंधीत अधिकार्यांनी यावेळी सांगितले.