मुंबई । आगामी मोसमात स्थानिक स्पर्धांच्या वेळापत्रकातून दुलीप ट्रॉफीला न वगळण्याची सूचना क्रिकेट प्रशासकिय समितीने बीसीसीआयला केली आहे. याआधी बीसीसीआयने जाहिर केलेल्या स्थानिक स्पर्धांच्या वेळापत्रकातून दुलिप ट्रॉफीला वगळण्यात आले होते. विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा खेळवण्यात येणार नसल्याची माहितीही बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे प्रमुख सौरभ गांगुलीलाही देण्यात आली नव्हती.
क्रिकेट प्रशासकिय समितीच्या सदस्या डायना एडलजी म्हणाल्या की, दुलिप ट्रॉफी स्पर्धा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आखण्यात येईल. यावेळी स्पर्धा खेळवू नका असे आम्ही बीसीसीआयला सांगितले नव्हते. ही खूपच प्रतिष्ठेची स्पर्धा आहे आणि ति खेळवण्यात आली पाहिजे. यंदा ही स्पर्धा होणार आहे. जुलै महिन्यात कोलकात्यात झालेल्या तांत्रिक समितीच्या बैठकित दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने गतवर्षीप्रमाणे गुलाबी चेंडूने खेळवण्याचा निर्णय झाला होता. पण बीसीसीआयने जाहिर केलेल्या वेळापत्रकात दुलीप ट्रॉफी स्पर्धेला स्थान देण्यात आले नव्हते. वेळापत्रकात स्पर्धेचा समावेश नसल्यामुळे गांगुलीने पत्र लिहून बीसीसीआयचे महाव्यवस्थापक एम.वी.श्रीधर यांच्याकडे स्पर्धेला वगळण्याचे कारण विचारले होते.