दुलिप ट्रॉफी वगळल्याचे सौरभ गांगुलीला माहितच नव्हते

0

कोलकाता । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचा प्रमुख सौरव गांगुलीला आगामी 2017-18 च्या हंगामातून दुलिप ट्राफीला वगळण्यात आल्याची कल्पना देण्यात आली नव्हती असे उघड झाले आहे. जुलै महिन्यात कोलकात्यात झालेल्या बीसीसीआयच्या बैठकित दुलिप ट्रॉफी स्पर्धेसाठी सफेद चेंडूऐवजी मागील वर्षीप्रमाणे यावेळीही गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय झाला होता. मात्र बीसीसीआयने जाहिर केलेल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांच्या वेळापत्रकात दुलिप ट्रॉफीचा समावेश करण्यात आलेला नाही. या संदर्भात गांगुलीने बीसीसीआयचे महाव्यवस्थापक एम. वी श्रीधर यांना पत्र लिहून दुलिप ट्रॉफीला वगळण्याची कारणे विचारली आहेत.

यासंदर्भात हैदरबादचा माजी कर्णधार असलेला श्रीधरला पाठवलेल्या इ मेलमध्ये गांगुली म्हणाला की, यावर्षी दुलिप ट्रॉफी खेळवण्यात येणार नसल्याची महिती मिळाली आहे. हे चूक आहे की बरोबर हे मला माहित नाही. पण तांत्रिक समितीच्या मागील बैठकित गुलाबी चेंडू दुलिप ट्रॉफीसाठी वापरण्याचा निर्णय झाला होता. उत्तर भारतातील पावसाळी हवामानामुळे दक्षिण भारतातल्या एखाद्या शहरात स्पर्धा खेळवण्याचा सल्ला देण्यात आला होता. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दुलीप ट्रॉफीचे सामने याआधी मोहाली किंवा धरमशाळा येथे खेळवण्याचा प्रस्ताव होता. पण पावसामुळे सामना रद्द होण्याची शक्यता गृहीत धरून हे सामने दक्षिण भारतात खेळवण्याची सूचना सौरव गांगुलीने केली होती.