दुषित पाणीपुरवठा थांबविण्यात यावा

0

चाळीसगाव । गेल्या 15 दिवसांपासून नगरपालिकेतर्फे शहरात गडद पिवळसर दुषीत पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाण्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. दुषीत पाण्यामुळे नागरिकांना अतिसार, टायफाईड, कॉलरा व काविळ आदींसारख्या जलजन्य आजारांची लागण होत आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष देऊन शुध्द पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शहर विकास आघाडीच्या नगरसेविका रंजनाताई सोनवणे यांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी मुख्याधिकारी यांना दिले.शहरातील विविध मागण्यांचे प्रश्‍न जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडणार असल्याचे सांगितले आहे. निवेदनावर रंजना सोनवणे, सुरेश खार, दिपक पाटील, रविंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, अलका गवळी, गिताबाई पाटील, शेखर देशमुख, शंकर पोळ आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

या आहेत मागण्या
माजी आमदार राजीव देशमुख यांच्या काळात गिरणा धरणावरुन केलेला पाणी पुरवठा व शुध्दीकरण प्रकल्पाचा शहरवासीयांसाठी योग्य वापर करण्यात यावा, सार्वजनिक नळांची व्यवस्था गरिबांसाठी करावी, दुषीत पाणी नमुने जळगाव येथील शासकीय दुषीत पाणी तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात यावे, सार्वजनकि शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी, रस्त्याची अवस्था दयनिय झाली असून रस्ते दुरुस्ती करण्यात यावी, रस्त्यांची कामे निकृष्ट झालेली असून याची चौकशी करण्यात यावी, वृक्षारोपनासाठी रोपे व ट्रीगार्ड नगरपालिकेमार्फत पुरविण्यात याव्यात, बॅनरमुक्त शहर ही संकल्पना राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे यांसह विविध मागणी त्यांनी केली आहे.

हंडामोर्चाचा इशारा
शहरातील एम.जी.नगर या प्रभाग क्रमांक 4 च्या भागात नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा अद्यापही होत नसल्याने या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाणी प्रश्‍न सोडवावा अन्यथा शंभर ते दिडशे महिलांचा हंडामोर्चा नगरपालिकेवर काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. येत्या आठवड्याभरात हंडा मोर्चा निघेल असेही सांगण्यात आले आहे. तसेच या भागातील रस्ते डांबरीकरण व गटारीयुक्त करावे अशी मागणी होत आहे.