दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

0

जळगाव। गेल्या काही महिन्यापासून शहरासह उपगनरांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी रहिवाश्यांकडून येत असून या दुषित व दुर्गंधीयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हेच नव्हे तर या दुषित पाण्यामुळे माठातच अळ्या पडण्याचे प्रकारही घडत आहे. या दुर्गंधीयुक्त पाणी पिल्यामुळे डोकेदुखी, पोटदुखी, सर्दी आदी समस्या नागरिकांसह लहान बालकांना भेडसावत असल्याने मनपाने या समस्याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. नागरिकांकडून वारंवार महापालिकेस या प्रकाराबाबत तक्रारी करूनही उपाय योजना होत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

दुषित पाण्याच्या तक्रारी
दरवर्षी उन्हाळ्यात शहरात पिवळया पाण्याचा पुरवठा होत असतो. यावर्षीदेखील काही दिवसांपासून नागरिकांना वाघूर धरणाच्या जलवाहिनीवरून येणारा पुरवठा दूषित होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. शहरातील पिंप्राळा परिसर, महाबळ, खोटेनगर, दादावाडी, मेहरूण, गेंदालाल मिल, निमखेडी, गणेश कॉलनी, भिकमचंद जैन नगर आदी शिवारात पिवळे व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरात काही भागात पाणी पुरवठा होत असतांना पहिला अर्धा तास पिवळे पाणी येत असल्याचे देखील सांगण्यात येत असून पाण्याला दुर्गंधी येत असल्याने उलट्या,मळमळ आदीं समस्या भेडसावत आहेत. वाघुरच्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती असल्याने हे प्रकार होत असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

माठात पडताहेत अळ्या
आधीच रखरखत्या उन्हाने नागरिक त्रस्त झालेले असतांना आता मनपाकडून होणारा पाणीपुरवठा पिवळा व दुर्गंधीयुक्त होत असल्याने नागरिकांना आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. लहान मुलांना याचा अधिक त्रास होत असून उलट्या,मळमळ यासारखे प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. हेच नव्हे तर या दुर्गंधीयुक्त व दुषित पाण्यामुळे माठात अळ्या होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे वाघुर धरणातील पाणी औषध टाकून शुध्द करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

जलकुंभाची निगा राखणे आवश्यक
गेल्या काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात जलकुंभांची सफाई करण्याचे अभियान नगरसेवक नितीन बरडे यांनी सभापती असतांना राबविले होते. मात्र, त्यानंतर कुणीही जलकुंभांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही. तीन ते चार महिन्यातून एकदा तरी जलकुंभ धुणे आवश्यक असतांना अनेक जलकुंभ हे वर्षानुवर्षांपासून धुतले जात नसल्याने जलकुंभांची निगा आता वार्‍यावर असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, यामुळे देखील पाण्यात पिवळसर पणा येवून ते दुषित होत आहे. महानगरपालिकेने यावर काही तरी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.