सेवा मित्र मंडळाच्यावतीने राबविला उपक्रम
पुणे : दुष्काळाच्या झळा सोसणार्या बीड सारख्या दुष्काळग्रस्त भागातील अनेक गावांमध्ये पाण्याअभावी दिवाळीचा आनंद अनेक कुटुंबापासून दूरच आहे. आपल्याकडे दिवाळीची तयारी उत्साहात सुरु असताना, तेथे मात्र कुटुंबातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण पाण्याच्या शोधार्थ वणवण फिरत असतात. त्यामुळे बीडमधील दुष्काळग्रस्त भागांतील घरांमध्ये फराळ पाठवून त्यांची दिवाळी गोड करण्याकरीता पुण्यातून पुढाकार घेण्यात आला आहे. दिवाळीचा सण एकट्याने साजरा करण्यापेक्षा सर्वांना घेऊन साजरा केल्यास ती दिवाळी मोठी आनंददायी ठरेल. आपण दिवाळी आनंदात साजरी करणार आणि त्यांना पाण्याचे शुक्लकाष्ठ. त्यामुळेच ही दिवाळी त्यांना पण आनंनददायी ठरेल, अशा उपक्रमाचे आयोजन केले आहे.
फराळाच्या बॉक्सची अभिनव संकल्पना
लोकसहभातून हा उपक्रम प्रत्यक्षात यावा, याकरीता फक्त 100 रुपयांत फराळाचा एक बॉक्स याप्रमाणे शेकडो बॉक्स दुष्काळग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याची अभिनव संकल्पना मांडण्यात आली आहे. लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस आणि सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे यांच्यावतीने ही संकल्पना राबविली जात आहे. लाडू व चिवडयाचा बॉक्स दुष्काळग्रस्त भागात कोणत्या कुटुंबांना पाठविले जाते, नागरिकांकडून किती फराळ पाकिटे पाठविली गेली, याची लेखी नोंद संस्थेतर्फे ठेवण्यात येणार आहे. यामुळे ज्या दुष्काळग्रस्त कुटुंबांना फराळ पाठविला जाईल, याची माहिती उपक्रमात सहभागी व्यक्तींना उपलब्ध होणार आहे.
आनंदात सहभागी करून घेऊ
किशोर सरपोतदार म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सण-उत्सवाचा आनंद लुटता यावा, याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामुळे सर्वांना आनंदाचे क्षण वाटता येतील. कमी खर्चात मोठा आनंद देता येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आपल्या आनंदात दुसर्यांना सहभागी करून घेण्याची संधी मिळेल. लक्ष्मी रस्त्यावरील पूना गेस्ट हाऊस, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आणि भांडारकर रस्त्यावरील साने डेअरी येथे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी सुरु आहे. उपक्रमात सहभागाकरीता 9422080220, 9822282653 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.